त्रिपूर वातींनी उजळणार ‘त्रिपुरारी’
By Admin | Updated: November 6, 2014 00:21 IST2014-11-05T23:39:50+5:302014-11-06T00:21:25+5:30
दीपोत्सव : गोदाघाटावर दीपदानासाठी थाटली दुकाने

त्रिपूर वातींनी उजळणार ‘त्रिपुरारी’
नाशिक : सज्जनांचे रक्षण करत दुष्टांचे निर्दालन करा, हा सामाजिक संदेश देणाऱ्या ‘त्रिपुरारी’ पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. ६) शहरातील गोदाघाटासह मंदिरांचा कोपरान्कोपरा त्रिपुरी वातींनी प्रकाशमान होणार असून, विविध धार्मिक विधींचेही आयोजन करण्यात आले आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेबाबत लोककथा सांगितली जाते. त्रिपूर नावाच्या असुराची आकाशसंचारासह तीन पुरे अर्थात नगरे होती. ब्रह्मदेवाने या असुराला देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून मरण नसल्याचा वर दिला होता. परंतु या असुराने नंतर आपला उन्मत्तपणा दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराला साकडे घातले. शंकराने त्रिपूर असुराची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि त्याचा नायनाट केला. तो दिवस कार्तिकी पौर्णिमेचा होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेतले जाते. गंगास्नान केले जाते आणि ब्रह्मवृंदाना दीपदान करण्याची प्रथा आहे. मत्स्यावतारही याच दिवशी झाल्याची आख्यायिका सांगितली जात असल्याने त्याचाही आनंद साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेला प्रदोष काळी त्रिपुरासुराला ठार मारले असल्याने त्याचा आनंदोत्सव म्हणून दिवाळीप्रमाणेच मंदिरे, नदीकिनारी दीप प्रज्वलित केले जातात. शिवमंदिरांसमोर त्रिपूर वातींनी परिसर प्रकाशमान केला जातो. दीपमाळ दिव्यांनी सजविली जाते. याचबरोबर नदीच्या पात्रातही प्रज्वलित केलेले दीप सोडण्याची प्रथा आहे. तसेच ‘त्रिपूरज्वलन’ हे व्रत केले जाते. शिवापुढे वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे असा विधी शास्त्रात सांगितला आहे. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा होतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि अन्य असुरांचा देवादिकांनी वध केल्याने दीपावलीपासून दीपप्रज्वलन करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपावलीची सांगता होत असते. समाजातील दुष्ट प्रवृत्ती जाळून टाका, असा सामाजिक संदेश त्रिपुरी वातींनी जाळून दिला जातो.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाघाट दिव्यांनी उजळणार असून, सायंकाळी नदीपात्रात दीप सोडण्यासाठीही महिलावर्गाची मोठी गर्दी उसळणार आहे. सोमेश्वरजवळील बालाजी मंदिरही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सहस्त्र दिव्यांनी उजळून निघणार आहे. (प्रतिनिधी)