मजूर संघाची निघाली सहल
By Admin | Updated: August 8, 2015 23:15 IST2015-08-08T23:15:03+5:302015-08-08T23:15:35+5:30
सोमवारी निवडणूक : २१ पैकी १६ संचालकांची उपस्थिती

मजूर संघाची निघाली सहल
नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (दि.१०) होत असून, या निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी शनिवारी (दि.८) मजूर संघाचे संचालक सहलीला गेले. अध्यक्षपदासाठी तिघांमध्ये स्पर्धा असली तरी ऐनवेळी नाव बदलण्याची शक्यता आहे.
मावळते अध्यक्ष राजाराम खेमनार व उपाध्यक्ष म्हसू कापसे यांनी राजीनामे दिल्यानंतर ते सहकार प्राधिकरणाने मंजूर केले असून, त्यानुसार येत्या १० आॅगस्ट रोजी जिल्हा सहकारी मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांनी जिल्हा परिषद सभापती केदा अहेर यांच्यासह माजी जिल्हा बॅँक संचालक राजेंद्र भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक रवींद्र देवरे यांच्या भेटी-गाठी घेऊन ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा होती. त्यातच बुधवारी (दि.५) सहलीला जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निवडणूक सोमवारी असल्याने आणि अन्य नेत्यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याने बुधवार ऐवजी शनिवारी (दि.८) सहलीला जाण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्हा मजूर संघाच्या कार्यालयात जवळपास २१ पैकी १६ संचालक जमले काही संचालक रस्त्यात असल्याने व उशिरा जाणार असल्याने या १६ संचालकांनी चार खासगी वाहनांमधून अलिबागकडे प्रयाण केल्याची चर्चा आहे. सहलीला जाणाऱ्या संचालकांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, गणपतराव चौधरी, दिलीप पाटील, प्रमोद मुळाणे, गोरख शिंदे, म्हसू कापसे, संजय चव्हाण यांच्यासह अन्य संचालकांचा समावेश होता.
जिल्हा परिषद सभापती केदा अहेर व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले हे उशिरा सहलीला जाणार आहेत. सोमवारी(१०) दुपारपर्यंत ही संचालक मंडळी नाशिकला पोहोचणार आहे. सायंकाळी पाच वाजेपासून निवडीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)