त्र्यंबकेश्वर दुमदुमले
By Admin | Updated: February 4, 2016 22:18 IST2016-02-04T22:17:03+5:302016-02-04T22:18:19+5:30
गिरीष महाजन : निवृत्तीनाथ मंदिराच्या विकासासाठी सहकार्य

त्र्यंबकेश्वर दुमदुमले
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे ज्ञानेश्वरांच्या विचारांना दिशा देण्याचे कार्य मोठे असून हे क्षेत्र महाराष्ट्राला आध्यात्मिक प्रेरणा देणारे ज्ञानकेंद्र आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पौषवारी यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे ५ वाजता त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ समाधीची पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते सपत्नीक पूजा झाली. यावेळी विश्वस्त संस्थानच्या वतीने झालेल्या सत्काराला महाजन यांच्या हस्ते सपत्नीक पूजा झाली. यावेळी विश्वस्त संस्थानच्या वतीने झालेल्या सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, राज्य वारकरी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष रामेश्वर शास्त्री, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे उपस्थित होते. त्र्यंबकेश्वराची नियमित सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत असल्याचे सांगताना पालकमंत्री महाजन म्हणाले, संत निवृत्तिनाथांच्या समाधीची सलग दुसऱ्या वर्षी माझ्या हातून पूजा होणे हा माझ्यासाठी मोठा संकेत आहे. या सोहळ्याच्या काळात दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी राज्याच्या विविध भागांतून पायी चालत दिंडीने येतात. येथे विविध आखाड्यांचे साधू-महंत ज्ञानीजन वास्तव्यास असून, निवृत्तिनाथ समाधी मंदिराबरोबरच ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वराचे मंदिरही येथे आहे.
या तीर्थक्षेत्राचे महत्त्व मोठे आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने येथे असंख्य कामे केली आहेत. अजूनही अनेक विकासकामे करण्यात येतील.
धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणच्या विकासासाठी निधी दिला गेला पाहिजे. या विचारातून व नियोजनबद्ध विकासासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिकारी नेमण्याचे विचाराधीन असल्याचे महाजन म्हणाले. येथील विकासासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून घेणे, कामाचे नियोजन करणे, कार्यवाही पूर्ण करणे आदि कामे हा अधिकारी करेल. पुढच्या वर्षीपर्यंत नवीन नियोजित कामांचे परिणाम दिसू लागतील याची खात्री देतो असे ते म्हणाले.