त्र्यंबकेश्वर दुुमदुमले
By Admin | Updated: August 16, 2016 22:40 IST2016-08-16T22:40:10+5:302016-08-16T22:40:57+5:30
बम बम भोले : दुसऱ्या श्रावणी सोमवारसह सुट्यांची पर्वणी

त्र्यंबकेश्वर दुुमदुमले
त्र्यंबकेश्वर : येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातच सलग सुट्यांची पर्वणी साधत सुमारे एक ते दीड लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वर दर्शनाचा लाभ घेतला, तर सुमारे एक लाख भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. पहिल्या सोमवारी फारशी गर्दी नव्हती, पण दुसऱ्या सोमवारी मात्र तिसऱ्या सोमवारच्या गर्दीचा अनुभव आला. मध्यरात्री १२ वाजेपासून भोलेहरचा जयघोष सुरू होता. त्र्यंबकेश्वर गावाबाहेर जिकडे पाहावे तिकडे खासगी वाहनेच दिसत होती.
श्रावण महिना म्हणजे व्रत- वैकल्याचा महिना. सर्वात जास्त सणवार, व्रतवैकल्ये याच महिन्यात असतात. या महिन्यात साधारणत:
‘श्रावणमासी हर्ष मानसी।
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे।
क्षणात फिरुनी ऊन पडे’
असा पावसाचा अनुभव असल्याने भाविक-पर्यटकांनादेखील हा अनुभव सुखद वाटतो. ब्रह्मगिरी परिक्रमा (फेरी) म्हणजे एक स्वर्गीय आनंद असतो. दऱ्या-खोऱ्या तुडवित, जोडीला निसर्गसौंदर्याचा अवर्णनीय अनुभव घेत भाविक चालत असतो. याशिवाय जमेची बाब म्हणजे खाली रस्तादेखील कॉँक्रिटीकरण झालेला असल्याने भाविक ब्रह्मगिरी फेरीची वाट तुडवित असतो. परतीच्या वाटेवर शेवटी भाविक अक्षरश: मलुल झालेला असतो. मंदिराच्या पूर्व दरवाजासमोरील २५ रांगा ओसंडून रांग थेट जुन्या जकात नाक्यापर्यंत पोहचली होती यावरून गर्दीचा अंदाज येऊ शकतो.
उत्तर महादरवाजासमोरदेखील पेड दर्शन बंद करण्यात येऊन महादरवाजा बंद करण्यात आला होता. त्यामुळे असंख्य भाविकांनी दरवाजावरच फुले वाहून दर्शन घेऊन समाधान मानून घेतले.
अनेकांनी कळसाचे तर लाइव्ह पूजा-दर्शन दिसत असल्याने भाविक समाधान मानत होते. पूर्व दरवाजाने दर्शन म्हणजे ५ ते ६ तास वेटिंग होय. दुसरा श्रावणी सोमवार अशा अनेक कारणांनी गाजला. तथापि, एवढे मात्र खरे की देवस्थानने दर्शन व्यवस्थेचे नियोजन अत्यंत चांगले केले असल्याने कुठलाही गोंधळ-हाणामारीचे प्रसंग उद्भवले नाहीत.
यासाठी देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, राजाभाऊ जोशी, जाधव, यादव, भांगरे आदि सारखे फिरत होते. संतोष कदम यांनी जातीने फिरून स्वच्छता, पाणी व स्ट्रीट लाईटची पाहणी आपल्या सहकाऱ्यांसह करत होते. दरम्यान, पुढील सोमवारी अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवेची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. निर्मला गावित यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. (वार्ताहर)