त्र्यंबकेश्वर देवस्थानने मागितले कोविड सेंटरचे भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST2021-09-26T04:17:00+5:302021-09-26T04:17:00+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर देवस्थानने कोविडकाळात उपलब्ध करून दिलेल्या भक्तनिवासाचे सुमारे ९९ लाख ६९ हजार रुपयांचे भाडे शासनाकडे मागितले आहे. ...

त्र्यंबकेश्वर देवस्थानने मागितले कोविड सेंटरचे भाडे
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर देवस्थानने कोविडकाळात उपलब्ध करून दिलेल्या भक्तनिवासाचे सुमारे ९९ लाख ६९ हजार रुपयांचे भाडे शासनाकडे मागितले आहे. या मागणीमुळे जिल्हा प्रशासनही चक्रावले असून, त्यांनी सदर मागणी ही अनाकलनीय असल्याचे सांगत, त्याबाबतचा तपशील उलटटपाली मागवला आहे. दरम्यान, अन्य राज्यांत विविध संस्थांना शासनाने भाडे दिले असताना देवस्थानने आपल्या वास्तूचे भाडे मागण्यात काय चूक आहे, असा सवाल ज्येष्ठ विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी केला आहे.
फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे शिवप्रासाद हे भक्तनिवास अधिग्रहित केले होते. सदर भक्तनिवास कक्षाने आतापर्यंत आपल्या ताब्यात ठेवले होते. याच भक्तनिवासाचे सुमारे ९९ लाख ६९ रुपयांची भाडे आकारणी आता देवस्थानने केली असून, तसे मागणीचे पत्र जिल्हा प्रशासनाला धाडले आहे. या पत्राने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. याबाबत विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सदर वास्तू ताब्यात घेताना वीज बिल कोण भरणार, घरपट्टी व पाणीपट्टी, आदींबाबत काहीच बोलणी झाली नव्हती. आज सदर वास्तू भाड्याने दिले असती तर त्यातून देवस्थानला लाखो रुपये उत्पन्न मिळाले असते. इतर राज्यांत अशा वास्तूंचे विविध संस्था, ट्रस्ट यांना तेथील शासनाने भाडे दिले आहे. मग आमच्या वास्तूचे आम्ही भाडे आकारले तर यात आमची काय चूक? आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे. ट्रस्टच्या वतीने कोरोना हटविण्यासाठी शासनाला ५१ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरसाठी सॅनिटायझर, मास्क, बादल्या, ऑक्सिमीटर, टेंपरेचर गन, आदी आवश्यक साहित्यदेखील पुरवले होते. लाॅकडाऊनच्या काळात इतरांबरोबर देवस्थानलादेखील विना उत्पन्न राहावे लागले. अशा परिस्थितीत विद्युत बिल, पाणीपट्टी, घरपट्टी ही बिले कुठून भरणार? असा सवालही गायधनी यांनी केला आहे.
दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या या मागणीबाबत विरोधकांनी देवस्थानच्या विश्वस्तांवर आरोप केले असून, सदर संस्था धर्मदाय असताना ती मागणी कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे.
कोट....
आम्ही चांगला कारभार करीत आहोत ते विरोधकांना पाहवत नाही. उलट मे २१ पासून नवीन चेअरमन न्या. विकास कुलकर्णी आल्यापासून वेगात कामे सुरू आहेत. विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे चांगली कामे करणाऱ्यांवर टीका होणारच. त्या दरम्यान लवकरच जिल्हा प्रशासन तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख जिल्हाधिकारी व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल तो अंतिम असेल.
- प्रशांत गायधनी, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान