त्र्यंबकेश्वरला गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मेपर्यंत मुदत
By Admin | Updated: April 8, 2015 01:26 IST2015-04-08T01:26:14+5:302015-04-08T01:26:37+5:30
त्र्यंबकेश्वरला गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मेपर्यंत मुदत

त्र्यंबकेश्वरला गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी मेपर्यंत मुदत
नाशिक : गोदावरी नदीत जाणारे सांडपाणी थांबविणे आणि अन्य कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेस मेअखेरपर्यंतची मुदत पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाने दिली आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या उगमस्थानीच त्यावर झालेले कॉँक्रिटीकरण हटवावे आणि प्रदूषण थांबवावे या दोन मागण्यांसाठी ललिता शिंदे, निशिकांत पगारे आणि राजेश पंडित यांनी हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. त्याआधारे न्यायाधिकरणाने नगरपालिकेस काही सूचना केल्या होत्या. नदीपात्रात जाणारे सांडपाणी थांबविण्यासाठी नगरपालिकेचे कामकाज सुरू असून, मे महिन्याच्या प्रारंभी हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. नदीपात्रात जाणारे पूजेचे साहित्य आणि अन्य कचरा या माध्यमातून बायोमिथेन तयार करण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू असून, हे कामही याच कालावधीत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. मात्र, न्यायाधिकरणाने आणखी काही दिवस मुदत देत २८ मेपर्यंत दोन्ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. गोदापात्राला पूररेषेचे सीमांकन करण्याचे काम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून, तेदेखील या कालावधीतच पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.