वाहनतळासाठी त्र्यंबकला जागा अधिग्रहण
By Admin | Updated: September 3, 2014 00:27 IST2014-09-03T00:27:37+5:302014-09-03T00:27:52+5:30
वाहनतळासाठी त्र्यंबकला जागा अधिग्रहण

वाहनतळासाठी त्र्यंबकला जागा अधिग्रहण
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा संपादत करण्यास अनुमती दिल्यानंतर राज्य सरकारने आता नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या वाहनांसाठी आठ ठिकाणी वाहन तळाची उभारणी व त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामसाठी सुमारे ४०० हेक्टर जागा संपादित करण्यास अनुमती दिली आहे.
मंगळवारी यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने त्यासंदर्भातील हालचालींना गती देण्यात आली आहे. दहा दिवसांपूर्वी नाशिक तपोवन परिसरात २६९ एकर जागा साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यास अनुमती दिली होती. प्रशासनाने सदरची जागा अधिग्रहीत करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक, संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा, त्यांच्या हरकती व म्हणणे जाणून घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जागेचे भाडे ठरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनाने जागा संपादित करण्याचा मार्ग खुला केला. वाहनतळासाठी आठ ते दहा महिने व साधुग्रामसाठी एक वर्ष जागा ताब्यात ठेवली जाणार असून, कुंभमेळ्याच्या आगमनासाठी लागणारा कालावधी पाहता, महिनाभरात या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केले आहे.
ब्रीज बारगळला
गोदावरी पात्रात पांटून ब्रीज (हवेने भरलेले प्लॅस्टिकचे ड्रम) तयार करण्याचा प्रस्ताव बारगळा आहे. अशा प्रकारे पूल उभारून गोदावरी नदी ओलांडण्यासाठी भाविकांना मदत होईल व गंगाघाटावरील गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा पोलिसांचा प्रस्ताव होता. पांटून ब्रीज उभारणे शक्य आहे किंवा नाही यासाठी समिती गठित करण्यात आली होती. त्यात पोलीस, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. परंतु चौकशीअंती गोदावरीवर पांटून ब्रीज उभारणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यात गोदावरी नदीच्या पाण्याला प्रवाह अधिक आहे व दोन्ही थडीचे अंतर तसेच उंच व सखल भाग अधिक असल्याने अशा ठिकाणी पूल उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.