आदिवासी भागातील वाघबारस उत्साहात
By Admin | Updated: November 8, 2015 23:00 IST2015-11-08T22:59:17+5:302015-11-08T23:00:48+5:30
हरसूल : नृत्य, भजन, लेजीमसह दिवाळीत आनंदोत्सव

आदिवासी भागातील वाघबारस उत्साहात
हरसुल : निसर्गाची पूजा हा आदिवासींचा खरा धर्म. वाघदेव हे त्यांचे प्रतीक. ज्या शक्तीच्या प्रभावामुळे हिंस्त्र श्वापदांपासून त्यांचे, त्यांच्या पशुधनाचे संरक्षण होते ती शक्ती वाघ्यात आहे, असे मानले जाते. ती भावना आदिवासी बांधावांच्या मनात असते. वाघ्याची मूर्ती दगडावर किंवा लाकडाच्या ओंडक्यावर कोरलेली असते. तोच आदिवासींचा वाघदेव.
पौष महिन्याच्या शुद्ध आणि वद्य १२ या दिवशी या दैवताचा उत्सव साजरा केला जातो. याला वाघबारस म्हणतात. महिनाभर आधी पारधीसाठी रानात गेलेले आदिवासींचे देव याच दिवशी परततात. त्यामुळे या दिवसाचे आदिवासी बांधवांमध्ये एक वेगळे महत्त्व आहे.
वाघ्याची देवस्थाने प्रत्येक गावात असतात. वाघबारसनिमित्त लोक शेतातील कामे बंद ठेवतात. नवे कपडे परिधान करून गुराखी आनंदोस्तव साजरा करतात. सकाळी सर्व लोक शिवावर किंवा वाघदेवाच्या स्थानावर जाऊन ंपूजा करतात़ ‘वाघ्याची भायरो दूध-भात खायरो, तांब्याला आसरा घरी दोन वासरा, दीवाळी-दसरा भाजीपाला विसरा’ असे गाणे म्हणून तांदूळ, दूध गोळा करतात. निधी गोळा करतात. आणि संध्याकाळी आसरावर गावातली सर्व गुरे एकत्र जमवतात, या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले, मुली एकत्र येतात.
गाईची शिंपणी करतात (शिंपणी म्हणजे दूध, गोमुत्र आदि एकत्र करून शिंपडणे). शिंपणी झाल्यावर शिवावर नैवेद्य देऊन
घरी परतून मारुती, वाघ्या किंवा गावदेवी मंदिरासमोर शेकोटी पेटवतात. येथे सर्व गुराखी एकत्र येतात. गुराखी निरनिराळी रुपे घेतात. (उदा. वाघ, अस्वल, कोल्हा इत्यादि) दुसरा गुराखी रुप घेतलेल्या वाघ, अस्वल, कोल्हा यांना विचारतो,‘ आमच्या शिवात येशील का?’’ रूपे घेतलेले गुराखी म्हणतात, ‘नाही नाही’. असा हा सण साजरा केला जातो. यानंतर भोजन दिले जाते.
रात्री देवळात भजन, लेजीम आणि इतर खेळ असे कार्यक्र म होतात. यालाच छोटी दीपावली असे म्हटले जाते. (वार्ताहर)