आदिवासींनी दिला प्रशासनाला दणका
By Admin | Updated: September 12, 2015 00:08 IST2015-09-12T00:06:22+5:302015-09-12T00:08:01+5:30
आठ तास ठिय्या : नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आदिवासींनी दिला प्रशासनाला दणका
येवला : आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात व विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा काढण्यात आला. तब्बल आठ तास हे आंदोलन चालले. रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले.
संघटनेच्या वतीने मोर्चाची पूर्वसूचना देऊनही प्रांताधिकारी वासंती माळी निवेदन स्वीकारण्यासाठी हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आठ तास प्रांताधिकारी कार्यालय आवारात २ हजार कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. तहसीलदार शरद मंडलिक यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शुक्र वारी सायंकाळी ७ वाजता दोन हजार आदिवासी बांधव रस्त्यावर आले. त्यांनी रास्ता रोको सुरू केला. पोलीस उपाअधीक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम राहिल्याने नगर-मनमाड रस्त्यावर ४ किमी अंतरावर रात्री उशिरापर्यत वाहतूक ठप्प होती.
एकलव्य संघटनेच्या वतीने दणका मोर्चाचे शुक्रवारी आयोजन केले होते. शनिपटांगण येथून मोर्चाला सुरुवात झाली. प्रांताध्यक्ष शिवाजीराव ढवळे, संघटक प्रवीण गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आदिवासी बांधवांच्या जमिनी कायद्यात बदल करून बिगर आदिवासी व बिल्डरच्या घश्यात घालण्यासाठी महसूल यंत्रणेचा प्रयत्न आहे. बड्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव खेळाल तर राज्यभरात आदिवासी पेटून उठेल. तलाठी सर्कल आणि पोलीस पाटील यांनी आदिवासींच्या जागेवर जाऊन पंचनामा करून जातीचे दाखले द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रांत संघटक प्रवीण गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. खावटी कर्ज माफ करून पुन्हा कर्ज उपलब्ध व्हावे, शासकीय वसतिगृह व्हावे, आदिवासी आश्रम शाळेत अत्याचार झाला तर शासनाने त्या शाळेची मान्यता काढून घ्यावी, आदिवासींचा स्तर सुधारण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढव्यात अशा मागण्या जळगाव जिल्हा अध्यक्ष सुधाकर वाघ, उत्तर महाराष्ट्राचे संघटक बाळासाहेब गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी यावेळी भाषणातून केल्या. मोर्चात मोठाभाऊ दळवी, रतन सोनवणे, रामकृष्ण निकम, वैभव सोनवणे, भिका पवार, संतोष निकम, नितीन मोरे, किरण मोरे, राजेंद्र पिंपळे, बहिरम खंडू, मारु ती मोरे, विजय गायकवाड, विजय चौधरी, पुडलिक माळी, संजय नवरे, नामदेव पवार, सहभागी झाले होते.
आदिवासींमध्ये वठणीवर आणण्याची धमक
आदिवासी आत्महत्त्या करीत नाहीत हा आदर्श घेण्यासारखा आहे. आंदोलन करून शासनाला ठिकाणावर आणण्याची धमक आदिवासी ठेवतो असे प्रतिपादन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी करताच टाळयांचा कडकडाट झाला. आदिवासींच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जातीचे दाखले व वनहक्क जमातीचे दावे निकाली काढू, याबाबत लेखी आश्वासन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी फॅक्सद्वारे शुक्र वारी रात्नी साडेआठ वाजता नासिकहून येवल्याला पाठवले अन् रास्ता रोको आंदोलन थांबले. त्यानंतर तब्बल दोन तास बंद असलेली नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाडे यांनी पोलिसांची कुमक बोलावली होती.