त्र्यंबकला आज अखेरची पर्वणी

By Admin | Updated: September 24, 2015 22:54 IST2015-09-24T22:51:47+5:302015-09-24T22:54:26+5:30

त्र्यंबकला आज अखेरची पर्वणी

Triangle today is the last resort | त्र्यंबकला आज अखेरची पर्वणी

त्र्यंबकला आज अखेरची पर्वणी

नाशिक : एकादशी व प्रदोषच्या मुहूर्तावर त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तात शुक्रवारी (दि. २५) शैवपंथीय साधू-महंत व लाखो भाविक स्नानाची पर्वणी साधतील आणि बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. या पर्वणीसाठी आखाडे, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कुंभपर्वाची अखेरची पर्वणी लक्षात घेता भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे.
बारा वर्षांनी नाशिक येथे वैष्णवपंथीय, तर त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथीय साधू-महंतांचा कुंभमेळा भरतो. नाशिकला रामकुंडात, तर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात साधूंसह भाविक स्नानाची पर्वणी साधतात. 
यंदाच्या पर्वात २९ आॅगस्ट, १३ सप्टेंबर रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील दोन पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. १८ सप्टेंबर रोजी नाशिकला भरपावसात अखेरची पर्वणी झाल्यानंतर सर्वांनाच त्र्यंबकच्या पर्वणीचे वेध लागले होते. या पर्वणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकमध्ये भाविकांचा ओघ वाढत असून, शुक्रवारी भाविकांची गर्दी शिखर गाठण्याची शक्यता आहे. सुमारे तीन ते पाच लाख भाविक स्नानासाठी त्र्यंबकला येण्याचा अंदाज आहे.
त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथीय साधूंचे आवाहन, निर्वाणी, निरंजनी, नया उदासीन, निर्मल, अटल, आनंद, जुना आखाडा, अग्नी, बडा उदासीन असे दहा आखाडे आहेत. आखाड्यांच्या मिरवणुकीचा व स्नानाचा क्रम हा प्रथम पर्वणीप्रमाणेच राहणार आहे. पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ३.४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणूक निघणार आहे. जव्हार फाटा, खंडेराव मंदिर, तेली गल्ली या मार्गे पहाटे ४.१५ पर्यंत मिरवणूक कुशावर्तावर पोहोचेल. ५ वाजेपर्यंत स्नान करून या आखाड्याचे साधू त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ६ वाजता आपल्या आखाड्यात परततील. खंडेराव मंदिरापासून या आखाड्यासोबत आवाहन व अग्नी हे आखाडेही राहणार असून, त्यांचे एकत्रितच स्नान होणार आहे. यानंतर पहाटे ४.२० ते दुपारी १२ या वेळेत उर्वरित सर्व आखाडे आपापल्या इष्टदेवता, निशाणासह मिरवणुकीने कुशावर्तावर दाखल होऊन स्नान करतील, त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आपापल्या आखाड्यांत परततील. दुपारी १२ वाजेनंतर कुशावर्त सामान्य भाविकांना स्नानासाठी खुले करून देण्यात येईल.

मिरवणूक अनुभवता येणार
आखाडे, भाविक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार कुशावर्त चौक ते त्र्यंबकेश्वर मंदिर या शाही मार्गावर बॅरिकेड्सच्या आत भाविकांना थांबू दिले जाणार आहे. त्यामुळे साधूंची शाही मिरवणूक भाविकांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे.
भाविकांसाठी बससेवा
तिसऱ्या पर्वणीला भाविकांच्या वाहतुकीसाठी साडेसहाशे बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. खंबाळे, पहिने व आंबोली येथे बाह्ण वाहनतळ असून, भाविकांच्या खासगी वाहनांना तेथे अडवले जाईल. तेथून भाविकांना बसद्वारे त्र्यंबकेश्वरपर्यंत जाता येईल. दरम्यान, गुरुवारपासूनच भाविकांचा त्र्यंबककडे ओघ सुरू झाला होता.
व्हीआयपींची मांदियाळी
त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या पर्वणीसाठी व्हीआयपींची मांदियाळीच होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांख्यिकी व संरक्षण राज्यमंत्री व्ही. के. सिंग, आसामचे राज्यपाल पी. बी. आचार्य, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, गोव्याचे निवडणूक आयुक्त एस. एल. जयस्वाल, झारखंडचे मंत्री चंद्रप्रकाश चौधरी आदि व्हीआयपी शुक्रवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे हजेरी लावणार असून, त्यामुळे प्रशासनावर चांगलाच ताण येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Triangle today is the last resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.