तपोवनातील वृक्ष ठरताहेत अंधश्रद्धेचे बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:44+5:302021-06-05T04:11:44+5:30

शहरातील वृक्षसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिका उद्यान विभागावर आहे. वृक्ष संवर्धनाकरिता या विभागाकडून वृक्ष प्राधिकरण समितीही गठीत ...

Trees in Tapovan are becoming victims of superstition! | तपोवनातील वृक्ष ठरताहेत अंधश्रद्धेचे बळी!

तपोवनातील वृक्ष ठरताहेत अंधश्रद्धेचे बळी!

शहरातील वृक्षसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिका उद्यान विभागावर आहे. वृक्ष संवर्धनाकरिता या विभागाकडून वृक्ष प्राधिकरण समितीही गठीत करण्यात आली आहे. अवैध वृक्षतोड, वृक्षांना वेगवेगळ्याप्रकारे हानी, धोका पोहोचेल, असे कृत्य रोखणे आणि जे लोक असे कृत्य करताना आढळून येतील त्यांच्याविरुद्ध वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देणे ही महत्त्वाची जबाबदारी या विभागाची आहे; मात्र शहरात सर्रास वृक्षांच्या जीवाशी खेळले जात आहे. काही व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसायाला आकार यावा म्हणून वृक्षाच्या बुंध्यावर फलकबाजी करत त्यांच्या आकारमान आणि वाढीसाठी पोषक ठरणाऱ्या खोडाच्या सालीला बाधा पोहोचविताना दिसते. आता तर वृक्षांचा थेट अंधश्रद्धेपोटी बळी घेण्याचाही प्रयत्न सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

एकेकाळी नाशिकचे दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोवन भागातील जेमतेम उरलेली वृक्षसंपदा आता अंधश्रद्धेमुळे धोक्यात सापडताना दिसते.

माहिती-तंत्रज्ञानाच्या विज्ञान युगातसुद्धा शहरातील वृक्षांना अशाप्रकारे अंधश्रद्धेचा फटका बसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. मनपा, पोलीस प्रशासनाने अशा लोकांवर सापळा रचून कारवाई करण्याची मागणी होत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालत असा ‘प्रताप’ घडवून आणण्यासाठी भोळ्याभाबड्या जनतेला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या भोंदूगिरी करणारी ‘बाबा गँग’च्या मुसक्या आवळण्याचे शहर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भूमाफियांचा ‘बंदोबस्त’ करणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भूमिगत असलेल्या तांत्रिक-मांत्रिकांचे उत्खनन करून कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

---इन्फो-- ‘ईदगाह’वरील वटवृक्षही टार्गेट भोंदूबाबांच्या सांगण्यावरून मोठा विस्तार झालेले जुने वटवृक्ष, काटेरी वृक्षांवर जादूटोणा अंतर्गत विविध ‘तोटके’ करण्यासाठी काळ्या बाहुल्या, लिंबू, भिलावे ठोकण्याचा सल्ला सर्रास शहरात दिला जात असल्याचे यावरून अधोरेखित होते. ईदगाह मैदानावरील वटवृक्षावरदेखील अशाचप्रकारे खिळे, बाहुल्या ठोकण्याचा वारंवार प्रयत्न रात्रीच्या अंधारात अनेकदा झालेला आहे.

--इन्फो--

अमावास्या, पौर्णिमेला चाले खेळ.... भोंदूगीरी करणाऱ्यांकडून विविध कौटुंबिक, व्यावसायिक समस्यांच्या निराकरणासाठी नानाविध अनोखे उपाय पीडितांना सांगितले जातात. त्यापैकीच एक म्हणजे अशाप्रकारे काळ्या बाहुल्या, लिंबू, भिलावे खिळ्यांच्या सहाय्याने झाडांच्या खोडांवर ठोकणे. यासाठी मुहूर्त निवडला जातो तो अमावास्या, पाैर्णिमेच्या रात्रीचा.

---

Web Title: Trees in Tapovan are becoming victims of superstition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.