वृक्षप्रेमींना गंगापूररोडवर धक्काबुक्की
By Admin | Updated: April 3, 2017 15:06 IST2017-04-03T15:06:45+5:302017-04-03T15:06:45+5:30
यासंदर्भात दुपारी शहरातील काही वृक्षप्रेमी गंगापूररोड भागात पाहणीसाठी गेले असता, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना धक्काबुक्की करून पिटाळून लावले.

वृक्षप्रेमींना गंगापूररोडवर धक्काबुक्की
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गंगापूररोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड महापालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाचा योग्य अभ्यास न करता दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून वड, पिंपळ, उंबरसारख्या संरक्षित प्रजातीच्या वृक्षांची देखील सर्रास तोड केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात दुपारी शहरातील काही वृक्षप्रेमी गंगापूररोड भागात पाहणीसाठी गेले असता, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना धक्काबुक्की करून पिटाळून लावले. याबाबत वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वृक्षप्रेमींकडून वृक्षतोडीला हरकत घेतली जात नाही, पण कायदेशीर न्यायालयाच्या निकालाच्या निर्देशानुसार वृक्षतोड करा, ही मागणी लावून धरली जात आहे. यामुळे गंगापूररोडवरील नागरिक, वृक्षप्रेमी आणि महापालिका यांच्यातील संघर्ष गेल्या गुरूवारपासून वाढत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेली वृक्ष तोडण्यास कुठलीही हरकत नसल्याची बाब वृक्षप्रेमींकडून वारंवार स्पष्ट केली जात आहे. मात्र महापालिकेने ‘उद्याचे दुखणे आजच संपवू’ याप्रमाणे सर्रासपणे न्यायालयीन निर्देशांकडे कानाडोळा करीत रस्त्यांलगतच्या झाडांवरही बुलडोझर फिरविला जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.