आरोग्य विद्यापीठाचा सिडनी विद्यापीठाशी करार
By Admin | Updated: September 26, 2014 23:47 IST2014-09-26T23:47:19+5:302014-09-26T23:47:59+5:30
संशोधनावर भर : एडस्, कर्करोगावर उपचारासाठी प्रयत्न

आरोग्य विद्यापीठाचा सिडनी विद्यापीठाशी करार
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आॅस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठ यांच्यात संशोधनात्मक कार्यासाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी दिली.
आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या इंडो-आॅस्ट्रेलिया ग्लोबल एंगेजमेंट आॅफिस चर्चासत्रात करारावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार दोन्ही देशांमधील विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन करण्यासाठी आदानप्रदान करण्यात येणार आहे.
एचआयव्ही, एचपीव्ही यांच्यातील संशोधन, मानेचा कर्करोग, कार्सिनोमा सर्विक्स आदी विषयांवरील संशोधनाला प्राधान्य दिले जाणार आहे. करारांतर्गत सिडनीचे विद्यार्थी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी सिडनीत जाऊन संशोधन करणार आहेत. सिडनी मेडिकल स्कूलने दहा फेलोशिप देण्याचे मान्य केले आहे. भारतामध्ये संशोधन करणाऱ्यांना अब्दुल कलाम रीसर्च फेलोशिप दिली जाते; परंतु त्याचा लाभ घेणारे विद्यार्थी कमी आहेत. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाने ‘ग्लोबल हेल्थ फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. जामकर म्हणाले.
विद्यापीठाच्या प्रतिनिधी मंडळात सहभागी झालेल्या डॉ. राज नगरकर यांनी भारतासाठी हा महत्त्वाचा करार असल्याचे सांगितले. सिडनी मेडिकल स्कूल नाशिकमध्ये कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणार असून, त्याच्या नोंदणीसाठी आरोग्य विद्यापीठ आयसीएमआरकडे नोंदणीसाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आज अधिसभा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शनिवारी होणाऱ्या अधिसभेत बहि:स्थ विद्यार्थ्यांचे वाढविलेले शुल्क, महाविद्यालयांमधील पार्किंगचा प्रश्न, पुनर्मूल्यांकन नियमावलीत बदल आदी विषय गाजण्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर विद्यापीठाची होणारी ही पहिली अधिसभा असेल. विद्यापीठात बॅरिस्टर बाबासाहेब जयकर यांचे स्मारक उभारावे, भारतरत्न सचिन तेंडुलकरला डी.लिट. पदवी द्यावी, विद्यापीठाने जल संधारणासाठी विविध कार्यक्रम हाती घ्यावेत आदी ठराव सुद्धा अधिसभेत मांडले जाणार आहेत.