अहिराणी बोलीभाषेत लोकसाहित्याचा खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:12+5:302021-07-16T04:12:12+5:30
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समितीतर्फे महाकवी कालिदासदिनी आयोजित राज्यस्तरीय अहिराणी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते ...

अहिराणी बोलीभाषेत लोकसाहित्याचा खजिना
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समितीतर्फे महाकवी कालिदासदिनी आयोजित राज्यस्तरीय अहिराणी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शिशीर हिरे उपस्थित होते. वाघ पुढे म्हणाले, केवळ चांगले लिहिणे महत्त्वाचे नसून साहित्यिक सद्गुणी व सदाचारी असले तरच सद्गुणांची पेरणी होईल, यासाठी अहिराणी लोकभाषेची ही चळवळ जिवंत ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. हिरे यांनी अहिराणीतील गोडवा विशद करून खान्देशातील समस्यांच्या निवारणासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
प्रारंभी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांनी सहभागी कवी आणि कवितेतील वैविध्याचा परामर्श घेतला. मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी कविसंमेलनाचा विषय आणि उद्देश स्पष्ट करीत अहिराणीचा जागर, प्रचार, प्रसार आणि अभ्यासक्रमात समावेशासाठी होत असलेला प्रयत्न याबाबत विवेचन केले. कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी खान्देशची महती स्पष्ट करून महाकवी कालिदास यांच्या 'मेघदूत'मधील कल्पनांची अहिराणी लोकसाहित्याशी जुळणाऱ्या समान धाग्यांचा सोदाहरण ऊहापोह केला. परिषदेचे कार्यवाह प्रमोद कुवर यांनी परिचय करून दिला. तांत्रिक धुरा प्रशांत पाटील यांनी सांभाळली. यावेळी दूरदर्शन मालिका 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक, लेखक, कलाकार सचिन गोस्वामी यांचाही सत्कार करण्यात आला.
कविसंमेलनात रंगत
कविसंमेलनात 'खान्देशनं पाणी जंजाळ' या विषयावर बारा, 'माहेरनी आखाजी' या विषयावर सतरा, तर 'कानबाई माय' या विषयावर चार तसेच अन्य विषयांवर ४० कवींनी रचना सादर करून सुमारे चार तास चाललेल्या संमेलनात रंगत आणली. यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबईसह गुजरातमधील कवींनी सहभाग नोंदवला.