वृक्षप्रेमींचे महापालिकेसमोर धरणे
By Admin | Updated: May 9, 2017 23:37 IST2017-05-09T23:37:48+5:302017-05-09T23:37:48+5:30
शहरातील विविध वृक्षप्रेमी संस्थांनी एकत्र येत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पाच हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले.

वृक्षप्रेमींचे महापालिकेसमोर धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूररोडसह ठिकठिकाणी महापालिकेने केलेल्या वृक्षतोडीस हरकत घेतानाच वाहतुकीस अडथळा न ठरणाऱ्या वृक्षांची तोड करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शहरातील विविध वृक्षप्रेमी संस्थांनी एकत्र येत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शहरात गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत पाच हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले. मानव उत्थान मंच, मूलभूत हक्क आंदोलन, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, लोकाधार, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, जीवनोत्सव, सर्वोदय परिवार, ग्रीन रिव्होल्यूशन, गिव्ह, मानव अधिकार संवर्धन संघटन व आवास या संस्थांच्या वतीने गेल्या १७ एप्रिलपासून शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू होती. या मोहिमेला पाच हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, महापालिकेकडून वृक्षतोडीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होत आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध वृक्षप्रेमी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर, जगबीरसिंग, मुकुंद दीक्षित, श्यामला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. न्यायालयाने रस्त्याच्या कडेपासून ५ फूट आत असणारी झाडे तोडण्यास मनाई केली आहे.
४दुभाजकातील वृक्षांना संरक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, या अटींचे पालन मनपाने केलेले नाही. तसेच पुनर्रोपणाची प्रक्रियाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महापालिकेने वृक्षतोड करून नागरिकांचा त्रास कमी केला की वाढविला, असा सवालही करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी (दि.११) महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे मुकुंद दीक्षित व जगबीरसिंग यांनी सांगितले.