निसर्गप्रेमींसाठी साकारला माहितीचा खजिना!
By Admin | Updated: November 16, 2016 22:56 IST2016-11-16T22:54:10+5:302016-11-16T22:56:42+5:30
निफाड : नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याजवळील खानगाव थडी येथील निसर्ग निर्वचन केंद्र

निसर्गप्रेमींसाठी साकारला माहितीचा खजिना!
निफाड : देश-परदेशातील पक्ष्यांची एकत्रित माहिती जिथे बघायला मिळते ते निसर्ग निर्वचन केंद्र निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याजवळील खानगाव थडी येथे गोदावरीकाठी उभारण्यात आले आहे.
नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर दरवर्षी देश-परदेशातून विविध पक्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यादरम्यान लाखोंच्या संख्येने येत असतात. हे पक्षी पाहण्यासाठी देशातून पर्यटक येथे असतात. या विविध पक्ष्यांबद्दलची सर्व माहिती येथील गाइड देत असतात. मात्र पर्यटकांना पक्ष्यांबद्दल, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याबद्दल सखोल माहिती चित्र रूपाने व्हावी, या उद्देशाने खानगाव थडी येथे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या पूर्वेला वन्यजीव विभाग नाशिकच्या वतीने एक एकर जागेत निसर्ग
निर्वचन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या केंद्रात दोन मोठे स्वतंत्र हॉल असून, प्रत्येक हॉलमध्ये नांदूरमधमेश्वर बंधारा, त्याचा इतिहास, क्षेत्र या विषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यादरम्यान देश- परदेशातून येणारे विविध जातीचे पक्षी, त्यांची उत्पत्ती, त्यांचे नाव, भौगोलिक स्थान याविषयी सर्व माहिती चित्र रूपाने या केंद्रात मांडण्यात आली आहे.
नांदूरमधमेश्वर बंधारा परिसरात आढळणारे बिबटे, तरसे साप व इतर प्राणी यांचीही माहिती या केंद्रात चित्ररूपाने लावण्यात आली आहे. काही पक्ष्यांच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. शिवाय वृक्षावर काही पक्ष्यांची घरटीसुद्धा साकारण्यात आली आहे.
पक्षी, पक्ष्यांच्या चोचीचे प्रकार, त्यांचे पाय, त्यांची पचन संस्था आदि माहिती चित्ररूपाने मांडण्यात आली आहे. या केंद्रात आलेल्या पर्यटकांना २० मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात येतो. हा माहितीपट बघताना आपण जणू नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर आहोत आणि त्या बंधारा परिसरात वावरणारे विविध पक्षी जवळून बघत आहोत असा भास होतो. नांदूरमधमेश्वर
बंधारा, त्याचा जलाशय, या बंधाऱ्यावर येणारे देश- विदेशातील विविध जातीचे पक्षी याबाबत सर्व सखोल माहिती या लघुपटात दाखविण्यात आली आहे. (वार्ताहर)