प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचारी जाळ्यात
By Admin | Updated: February 25, 2015 23:13 IST2015-02-25T23:12:56+5:302015-02-25T23:13:08+5:30
लाचलुचपत विभागाचा छापा : सव्वादोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचारी जाळ्यात
मालेगाव : येथील महसूलच्या नवीन इमारतीत सव्वादोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी संदीप पाटील यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी नाना बागडे अलगद अडकले. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी प्रांत कार्यालयात लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने नाना बागडे याला लाच घेताना छापा टाकून पकडले. करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील झोडगे येथील गट नं. ३९४/२ या पाच एकर जमिनीपैकी दोन एकर जमिनीचा बिनशेती परवाना घेण्यासाठी जमीनमालकाने २०१२ मध्ये येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यावेळी त्याच्याकडे पैशाची मागणी झाली; परंतु त्यांनी ती पूर्ण केली नाही म्हणून त्यांचे काम रखडविले गेले. या प्रकरणी जमीनमालकाने सदर अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असता त्यांच्याकडे प्रत्येकवेळी पैशाची मागणी करण्यात आली. त्याला कंटाळून त्याने नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. (पान २ वर)
त्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाचे पथक मंगळवारी शहरात दाखल झाले होते. त्यांनी पडताळणी केली. यात प्रांत अधिकारी पाटील यांनी दोन लाख रुपये रकमेची मागणी केली असता त्यांना दीड लाख रुपये देण्याचे निश्चित झाले, तसेच संबंधित कामकाज पाहणारे कर्मचारी नाना बागडे यांनी ७५ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या मागणीनुसार सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी प्रांत कार्यालयात नाना बागडे यांनी टेबलावर प्रांत अधिकाऱ्यांचे दीड लाख व स्वत:चे ७५ हजार असे एकूण सव्वादोन लाख रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक करपे यांच्यासह हवालदार विलास वाघ, दिलीप ढुमणे आदि कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून त्यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस अधीक्षक बी. एस. जाधव आपल्या सहकाऱ्यांसह मालेगावी दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या सूचना करत घटनास्थळाची पाहणी करून प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या झडती सत्रात उपअधीक्षक किशोर मोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
हा छापा यशस्वी झाल्यानंतर या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याच्या घरांची झडती घेण्यात आली. यासाठी नाशिकच्या अतिरिक्त पथकासह मदत करण्यासाठी धुळे येथील पथकाला शहरात पाचारण करण्यात आले होते. तसेच प्रांत अधिकारी पाटील यांच्या मूळगावी चोपडा येथील घराचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. या झडतीत काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत विभागाचे अधीक्षक प्रवीण पवार यांनी मालेगावी भेट देऊन छावणी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या छाप्याची बातमी पसरल्यानंतर छावणी पोलीस ठाणे तसेच प्रांत कार्यालयात मोठी गर्दी झाली, तर छाप्यामुळे येथील महसूल विभागात तत्काळ सामसूम झाली. अनेकांनी कार्यालयाकडे फिरकण्याचेही टाळले. काहींनी स्वत:चे भ्रमणध्वनी बंद केले. दिवसभर कर्मचारी दडपणाखाली वावरत होते.