वाहतूक बेटांची दुरवस्था; फुलझाडे कोमजली
By Admin | Updated: February 4, 2016 23:29 IST2016-02-04T23:28:36+5:302016-02-04T23:29:25+5:30
दुर्लक्ष : प्रशासनाविरुद्ध नाराजी

वाहतूक बेटांची दुरवस्था; फुलझाडे कोमजली
पंचवटी : महापालिका प्रशासनाने पंचवटी परिसरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी तसेच मुख्य चौकात तयार केलेल्या वाहतूक बेटांची सध्या दैनीय अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मनपाने तयार केलेल्या या वाहतूक बेटात सुंदर फुलझाडे तर लावली खरी. मात्र, सध्या या फुलझाडांना वेळेवर पाणीच मिळत नसल्याने उन्हामुळे वाहतूक बेटातील फुलझाडे कोमजली आहे.
प्रशासनाने वाहतूक बेटांची निर्मिती करून काही वाहतूक बेटाची देखभाल स्वत:कडे तर काही वाहतूक बेट देखभाल करण्यासाठी संस्थांना दिले आहेत. सुरुवातीला या वाहतूक बेटांची व्यवस्थितपणे निगा घेत त्यांची नियमितपणे साफसफाई करणे तसेच पाणी टाकणे हे काम केले जात होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून या वाहतूक बेटाकडे मनपा प्रशासनाचे व ज्या संस्था देखभाल करणार होत्या त्यांचेही काहीसे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक बेटातील सुंदर फुलझाडे सुकू लागली आहे.
फुलझाडांपाठोपाठ वाहतूक बेटात बसविलेल्या शिल्पावरदेखील मोठ्या प्रमाणात धूळ साचल्याने वाहतूक बेटांना अवकळा आली आहे. मनपाच्या संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन वाहतूक बेटातील फुलझाडांना पाणी टाकण्यापाठोपाठ बेटातील शिल्पांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली
आहे. (वार्ताहर)