शेअर बाजारात सेबीमुळे पारदर्शकता
By Admin | Updated: February 6, 2016 00:26 IST2016-02-06T00:15:38+5:302016-02-06T00:26:27+5:30
चंद्रशेखर ठाकूर : डीमॅट खात्यांमुळे शेअर खरेदी-विक्री गतिमान

शेअर बाजारात सेबीमुळे पारदर्शकता
नाशिक : सेबीमुळे शेअर बाजारात पारदर्शकता आणि शिस्त आल्याचे सांगत डीमॅट अकाउंटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेअर बाजार गतिमान झाल्याचे सीडीएसएलचे निवृत्त गुंतवणूकदार मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर यांनी सांगितले. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारे रोखीचे व्यवहार करणे टाळत सिक्युरिटी अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाच्या (सेबी) मार्गदर्शक नियमांनुसार गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मु. शं. औरंगाबादकर सभागृहात एलकेपी सिक्युरिटिज व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) यांनी संयुक्त आयोजित केलेल्या ‘श...शेअर बाजाराचा’ यावर ते बोलत होते. शेअर बाजार म्हणजे काय? स्टॉक मार्केट व त्याचे व्यवहार, रुपयाचे अवमूल्यन व रुपया वधारणे, गुंतवणुकीचे पर्याय, सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे व तोटे, डीमॅट प्रणालीमुळे शेअर खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये झालेले बदल तसेच आॅनलाइन ट्रेडिंग याविषयी मार्गदर्शन केले. शेअर बाजाराच्या नावावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी सेबीच्या नोंदणीकृत दलाल तथा संस्थेकडून गुंतवणूक करण्याचे आवाहन करताना ठाकूर म्हणाले, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी सेबीमार्फत शेअर बाजारातील दलाल व संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहे.
सेबीचे ब्रोकर संस्थांवर नियंत्रण असून नियमांनुसार गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबी १५ लाख रुपयांचे सुरक्षाकवच देत असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र खरेदी-विक्रीच्या व्यवहारात झालेल्या नुकसानीस सेबी जबाबदार राहत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या शेअर बाजाराच्या नावावार विविध प्रकारच्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. अशा प्रकारांमुळे शेअरबाजार बदनाम होत असून व्यवहार करताना ती सेबीकडे नोंदणी झालेल्या दलालांकडून करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गुंतवणूक तज्ज्ञ विश्वनाथ बोदडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)