वनविभाग साकारणार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:48 IST2018-05-15T00:48:48+5:302018-05-15T00:48:48+5:30
शहर व परिसरात एखादा दुर्मिळ पक्षी किंवा वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्याच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. या प्रश्नावर वनविभागाने उत्तर शोधले आहे. मुक्या जिवांना शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या दिशेने वनविभागाने पाऊल टाकले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

वनविभाग साकारणार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्र
नाशिक : शहर व परिसरात एखादा दुर्मिळ पक्षी किंवा वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्याच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. या प्रश्नावर वनविभागाने उत्तर शोधले आहे. मुक्या जिवांना शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या दिशेने वनविभागाने पाऊल टाकले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे. शहरात आतापर्यंत जखमी पक्षी किंवा प्राण्यांवर पक्षिमित्र व प्राणिमित्रांच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात केले जात आले आहे. काही वेळा नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात जखमी वन्यजिवांना आश्रय देत त्यांच्यावर औषधोपचार केले गेले. एकूणच जखमी प्राणी, पक्ष्यांची शहरात हेळसांडच होत आली आहे. भूतदयेतून जरी मुक्या जिवांसाठी नागरिक धावून जात असले तरी त्यांच्यावर शास्त्रीयदृष्ट्या योग्य औषधोपचार होईलच, याची शाश्वती देता येत नाही; मात्र यापुढे असे होणार नाही कारण वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, पुण्यामधील कात्रज येथील केंद्राच्या धर्तीवर नाशिकमध्ये लवकरच ‘ट्रान्झिट अॅन्ड ट्रिटमेंट’ केंद्र सुरू करण्याचा नाशिक पश्चिम वनविभागाचा प्रयत्न आहे. मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव व उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. या केंद्रासाठी जागेचाही शोध घेण्यात आला असून, शहरापासून जवळ किंवा काही मिनिटांच्या अंतरावर हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. दोन ठिकाणांचा पर्याय रामाराव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे शहरातील पक्षिप्रेमी, प्राणिप्रेमी संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण हे केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जखमी मुक्या जिवांचा सांभाळ व औषधोपचाराची मोठी समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
नागपूर वन्यजीव विभाग सकारात्मक
नाशिकमध्ये ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याबाबत लागणारी मंजुरी व निधीच्या उपलब्धतेबाबत नागपूर वन्यजीव प्रधान वनसंरक्षक कार्यालय सकारात्मक आहे. कार्यालयाकडून याबाबत तयारी दर्शविली गेली असून, केवळ प्रस्तावाचा प्रतीक्षा या कार्यालयाला आहे. त्यामुळे वनविभागाच्या पश्चिम कार्यालयाकडून प्रस्ताव व नियोजनबद्ध आराखडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांच्या पथकाकडून तयार केला जात आहे.
पथकाचा पुणे अभ्यासदौरा
पुण्यामधील कात्रज येथे असलेल्या वनविभगाच्या वन्यजीव रिहॅबिलिटीशेन केंद्राला नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. येथील कें द्रामधील सोयीसुविधा, वैद्यकीय उपचारपद्धती, पशुवैद्यकीय डॉक्टर व त्यांचे सहायकांची संख्या, आवश्यक औषधे, पिंजऱ्यांची रचना आदी बाबी विचारात घेत निरीक्षण नोंदविण्यात आले. यानुसार प्रस्ताव तयार करताना सर्व आवश्यक बाबी व सोयीसुविधांचा अंतर्भाव त्यामध्ये केला जाणार आहे.
रोपवाटिकांमधील जागेचा विचार
मुक्या जिवांवर योग्य वैद्यकीय उपचार व्हावे, यासाठी वनविभागाला उशिरा का होईना ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची गरज जाणवली. मागील अनेक वर्षांपासून याबाबत मागणी होत आहे. हे केंद्र पुढील दोन महिन्यांमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यासाठी जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाजवळील नाशिक रोपवाटिका, गंगापूर गावाच्या पुढे असलेल्या रोपवाटिकेमधील जागेचा विचार केला जात आहे.