जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:07+5:302021-07-16T04:12:07+5:30
चालू वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी, बऱ्यापैकी रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, असे असतानाही जून अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
चालू वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला तरी, बऱ्यापैकी रुग्णसंख्या घटली आहे. मात्र, असे असतानाही जून अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत अशा सूचना शासनाने केल्या होत्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही बदल्यांबाबत शासनाकडून काहीच मार्गदर्शन प्राप्त न झाल्यामुळे यंदा बदल्या होतील की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात हाेती. परिणामी कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री, लोकप्रतिनिधींना गाठून त्यांच्याकडून शिफारस पत्रे मिळवून प्रशासनावर बदल्यांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्या करण्याचे धोरण जाहीर केल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा लागली होती. बुधवारी (दि. १४) ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील आदेश जारी करून येत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याची मुभा दिली आहे. या बदल्यांमध्ये सन २०१४ चे नियम व अटींची पूर्तता करावी, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दहा टक्के विनंती व दहा टक्के प्रशासकीय अशा प्रकारे २० टक्के बदल्या केल्या जाणार असून, त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे आरोग्य व पाणीपुरवठा विभागात फक्त पाच टक्केच विनंती बदल्या करता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.
चौकट==== राजकीय शिफारशींचा पाऊस
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्राप्त होत नाही तोच जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शिफारशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी नेमणूक देण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.