बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या अद्यापही कागदावरच
By Admin | Updated: May 12, 2014 23:18 IST2014-05-12T22:59:19+5:302014-05-12T23:18:35+5:30
अंतिम याद्या प्रसिद्धीसाठी दोन दिवसांचा कालावधी

बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या अद्यापही कागदावरच
अंतिम याद्या प्रसिद्धीसाठी दोन दिवसांचा कालावधी
नाशिक : शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या करण्याची घाई प्रशासनाने सुरू केलेली असतानाच, सर्वाधिक संख्या असलेल्या शिक्षण विभागातील बदलीपात्र शिक्षकांच्या अंतिम सेवाज्येष्ठता याद्या अद्यापही प्रसिद्ध झालेल्या नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दोेन दिवसांत बदलीपात्र शिक्षकांच्या अंतिम याद्या फलकावर लावण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले आहेत.
जिल्हा परिषदेतील एकूण बदलीपात्र कर्मचार्यांची संख्या १६५७ इतकी असून, त्यात प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षक बदल्यांच्या कार्यवाहीसाठी आधी सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या याद्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करून त्यावर हरकती व आक्षेप मागविणे नियमानुसार आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या अन्य विभागातील कर्मचार्यांच्या मात्र सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करून त्यावर आलेल्या हरकती व आक्षेप यांची तपासणी करून अंतिम बदलीपात्र कर्मचार्यांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मोेठी संख्या असलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता याद्या मात्र अद्याप प्रसिद्ध झालेल्या नाहीत. येत्या २४ तासांत त्या याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती व आक्षेप आल्यानंतर तपासणीनंतर दोन दिवसांत अंतिम सेवाज्येष्ठ बदलीपात्र कर्मचार्यांच्या याद्या नोटीस फलकावर लावण्यात येतील, असे शिक्षण विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)