नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले
By अझहर शेख | Updated: May 31, 2023 16:57 IST2023-05-31T16:56:41+5:302023-05-31T16:57:03+5:30
पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत.

नाशिकच्या पाच सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, वन्यजीव विभागाच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटले
नाशिक : पूर्व, पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. यामध्ये पश्चिम विभागाचे गणेशराव झोळे तर पुर्वचे सुजित नेवसे, हेमंत शेवाळे आणि संजय मारे यांचा समावेश आहे. तसेच मालेगावचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांचीही बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाचे अवर सचिव आनंदा शेंडगे यांनी सर्वसाधारण बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) काढले.
राज्याच्या वनविभागातील प्रादेशिक, वन्यजीव, व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण आदी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या गट अ कनिष्ठ श्रेणी सहायक वनसंरक्षक या संवर्गातील ३९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयातील तृप्ती निखाते यांची नाशिक वन्यजीव विभागाच्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याच्या सहायक वनसंरक्षकांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितितील यावल अभयारण्यातील सहायक वनसंरक्षकांची जागाही मागील काही महिन्यांपासून रिक्त होती. या जागेवर गणेशराव झोळे यांची तसेच यावल फिरते पथकाच्या सहायक वनसंरक्षकपदाची सुत्रे हेमंत शेवाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजीत नेवसे यांची धुळे येथे तांत्रिक विभागात बदली करण्यात आली आहे. जगदिश येडलावार यांची जालना येथील संशोधन केंद्रात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, झोळे, नेवसे, मोरे, शेवाळे येडलावार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, यामुळे ही पदे रिक्त राहिली आहेत.
सहायक वनसंरक्षकांची लवकरच होणार पदोन्नती
राज्य शासनाने सहायक वनसंरक्षकांच्या केलेल्या या बदल्यांमध्ये झोळे, नेवसे, मोरे, शेवाळे हे सर्वच अधिकारी पदोन्नतीला पात्र आहेत. यामुळे येत्या महिनाभरात त्यांची पदोन्नतीने पुन्हा नव्याठिकाणी पदस्थापना शासनाकडून केली जाऊ शकते. यामुळे नाशिक वन्यजीव विभागातील सहायक वनसंरक्षकांची रिक्त असलेली पदे भरली गेली असली तरी ती तात्पुरत्या स्वरुपात आहे, असे बोलले जात आहे.