महापालिका वैद्यकीय अधीक्षकांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:09 IST2017-08-05T01:08:52+5:302017-08-05T01:09:51+5:30
दोन वर्षांच्या काळात नेहमीच आरोपीच्या पिंजºयात राहिलेले महापालिकेचे वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांची अखेर बदली झाली असून, त्यांना पुणे येथे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सहसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.

महापालिका वैद्यकीय अधीक्षकांची बदली
नाशिक : दोन वर्षांच्या काळात नेहमीच आरोपीच्या पिंजºयात राहिलेले महापालिकेचे वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांची अखेर बदली झाली असून, त्यांना पुणे येथे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सहसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐन तोंडावर १६ मे २०१५ रोजी महापालिकेच्या आरोग्याधिकारीपदी डॉ. विजय डेकाटे यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाली होती. वर्षभराच्या कालावधीसाठी नियुक्त झालेल्या डेकाटे यांनी महापालिकेत दोन वर्षे काढली. सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्वच्छतेच्या ठेक्यापासून ते घंटागाडी, पेस्टकंट्रोल आदी विविध प्रकारच्या ठेक्याप्रकरणी डॉ. डेकाटे यांच्यावर आरोप झाले. प्रशासकीय पातळीवर त्यांना वारंवार नोटिसाही बजावण्यात आल्या. महासभा-स्थायी समितीवर डेकाटे हे नेहमीच सदस्यांचे लक्ष्य बनले. डेकाटे यांच्याबद्दल वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वीच आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी डेकाटे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून तो डॉ. सुनील बुकाणे यांच्याकडे सोपविला होता, तर डेकाटे यांना वैद्यकीय विभागाच्या रिक्त असलेल्या अधीक्षकपदी बसविण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी (दि.३) डेकाटे यांच्या बदलीचे आदेश शासनाने काढले असून, त्यांची पुण्याला बदली केली आहे.