नाशिक : महापालिकेत यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत मिळाले असून, प्रशासनाने तयार केलेल्या बदल्यांच्या यादीवर आयुक्तांनी स्वाक्षरी केल्याचे समजते. येत्या सोमवारी किंवा बुधवारी बदल्यांची हंडी फुटण्याची शक्यता आहे.महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तीन वर्षे मुदत संपूनही एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून प्रशासनाकडून त्यावर काम सुरू आहे. सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असून, एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांनाही हलविले जाणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने बदल्यांची यादी तयार केली असून, त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्याचे समजते. येत्या सोमवारी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतर बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता असून, बदल्यांची चर्चा मात्र पालिका वर्तुळात आतापासून सुरू आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेत बदल्यांची हंडी लवकरच फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 23:14 IST