सटाण्यात शेतकर्‍याला चिरडणारा ट्रेलर

By Admin | Updated: May 12, 2014 20:41 IST2014-05-11T20:33:34+5:302014-05-12T20:41:36+5:30

सटाण्यात शेतकर्‍याला चिरडणारा ट्रेलर

A trailer for the farmer in the neighborhood | सटाण्यात शेतकर्‍याला चिरडणारा ट्रेलर

सटाण्यात शेतकर्‍याला चिरडणारा ट्रेलर

संतप्त जमावाने पेटविला ट्रेलर

सटाणा : शहरापासून जवळच असलेल्या यशवंतनगर येथील हॉटेल मधुबनसमोर शनिवारी सकाळी भरधाव वेगाने जाणार्‍या लोखंडी प्लेटसने भरलेल्या मालवाहू ट्रेलरने दूध वाटप करण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यास चिरडत १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याने संतप्त जमावाने ट्रेलर पेटवून दिला. परिणामी, या घटनेमुळे राज्य महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाल्याने मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यातच सटाणा नगर परिषदेचा अग्निशामक बंब निकामी असल्याने मालेगाव येथून आग विझविण्यासाठी बोलाविण्यात आलेला बंब तब्बल अडीच तासांनंतर पोहोचल्याने ट्रेलर पूर्णत: जळून खाक झाला. या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विंचूर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर येथे हॉटेल मधुबनसमोर तरसाळी येथील शेतकरी कैलास झिप्रू चव्हाण (५२) मोटारसायकलने (क्र. एमएच ४१ एच १३६१) दूध वाटप करून सटाण्याच्या दिशेने येत होते. त्यांच्या पाठीमागून भरधाव येणार्‍या मालवाहतूक करणार्‍या ट्रेलरने ओव्हरटेक करून पुढे जाणार्‍या चव्हाण यांच्या मोटारसायकल वाहनास पाठीमागून धडक दिली. यामुळे चव्हाण हे वाहनाच्या खाली सापडल्याने त्यांच्या मेंदूचा चेंदामेंदा होऊन ट्रेलरने त्यांचा मृतदेह जवळपास १०० फूट पुढे ओढत नेला. परिणामी प्रत्यक्षदर्शीच्या भावनांचा प्रचंड उद्रेक झाला. यावेळी तातडीने भरत सोनवणे यांनी मृतदेह चाकाखालून ओढून काढण्याचा प्रयत्न केला. तितक्यात संतप्त जमावाने ट्रेलर पेटवून दिला. तोपर्यंत पोलीस निरीक्षक भागवंत जायभावे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, राज्य महामार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने गुजरात राज्याकडे जाणारी वाहतूक नामपूरमार्गे वळविली होती, तर नाशिककडे जाणारी वाहतूक राज्य मार्गावरच थांबविण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथून अग्निशामक दलाचा बंब दाखल झाल्यानंतर ट्रेलरची आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्रेलर जळून खाक झाला होता. सुदैवाने ट्रेलरच्या डिझेल टाकीने पेट घेऊनही कोणताही अनर्थ घडला नाही. अपघाताच्या चर्चेने सटाणा शहरातील नागरिकांनी पेटता ट्रेलर बघण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस निरीक्षक भागवंत जायभावे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रज्ञा जेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. मालवाहू ट्रेलरचा चालक व क्लिनर फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघातात मृत झालेले कैलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. १९ मे रोजी त्यांच्या पुतणीचा विवाह होणार होता. (वार्ताहर)

Web Title: A trailer for the farmer in the neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.