ट्रायकॉममध्ये टाळेबंदी, नाशकातून स्थलांतर
By Admin | Updated: November 2, 2015 23:08 IST2015-11-02T23:07:43+5:302015-11-02T23:08:34+5:30
ट्रायकॉममध्ये टाळेबंदी, नाशकातून स्थलांतर

ट्रायकॉममध्ये टाळेबंदी, नाशकातून स्थलांतर
सातपूर : शहरात गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या आयटी कंपनी म्हणजेच ट्रायकॉम इंडिया कंपनीने कामगार युनियनशी झालेल्या संघर्षामुळे अखेरीस टाळेबंदी घोषित केली असून, कंपनी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संपाबाबत कामगार उपआयुक्त कार्यालयाने बोलाविलेल्या बैठकीस व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही उपस्थित राहिले नसल्याने बैठक रद्द करण्यात आली.
कंपनी व्यवस्थापनाने रविवारी प्रवेशद्वारावर १६ नोव्हेंबरपासून टाळेबंदी जाहीर करण्यात येणार असल्याची नोटीस लावली आहे.
वेतनवाढीचा प्रलंबित करार, दर महिन्याचे वेतन नियमित मिळावे, बोनस दिवाळीपूर्वी मिळावा, निलंबित कामगारांना कामावर घ्यावे, वेतनातून कपात केलेला संपूर्ण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्यात यावा या मागणीसाठी सीटू युनियनच्या नेतृत्वाखाली सातपूर औद्योगिक वसाहतीतील ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी २३ आॅक्टोबरपासून संप पुकारला आहे. दरम्यानच्या काळात कामगार उपआयुक्तांच्या दालनात वेळोवेळी बैठक घेण्यात आली. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. सोमवारी पुन्हा सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांनी बैठक बोलावली होती. तत्पूर्वी कंपनी व्यवस्थापनाने लावलेल्या नोटिसीनुसार १६ नोव्हेंबरपासून कंपनीने लॉकआउट (टाळेबंदी) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांनी बोलावलेल्या बैठकीस व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही उपस्थित राहिले नाही. (प्रतिनिधी)