वाहतूक पोलीस अधिकाºयाच्या अंगावर घातली दुचाकी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:06 IST2017-09-10T23:03:12+5:302017-09-10T23:06:14+5:30

वाहतूक पोलीस अधिकाºयाच्या अंगावर घातली दुचाकी...
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ यामध्ये भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी साडेसहा ते नऊ वाजेच्या सुमारास आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया वाहनधारकांवर कारवाई करीत होते़ सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास एबीबी सर्कलवरून सातपूर गावाकडे भरधाव जाणारा दुचाकीस्वार मयूर विजय देवरे (२०, रा़ उमराणे, ता़ देवळा, जि़ नाशिक) हा विनाहेल्मेट जात असताना त्यास थांबण्याचा इशारा करण्यात आला़ मात्र त्याने आदेशाचे उल्लंघन करीत जोरात दुचाकी दामटवली व त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी भाले यांच्या अंगावर गेली़
या अपघातात पोलीस अधिकारी भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुचाकीस्वार देवरे हा किरकोळ जखमी झाला आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात देवरे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यापूर्वी शालिमार चौकात वाहतूक पोलीस जगन्नाथ बारी तसेच नाशिकरोडला पोपट पवार यांना मारहाण केल्याची घटना घडली होती़