वाहतूक बंद; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:41 IST2017-07-18T00:36:51+5:302017-07-18T00:41:28+5:30
घोटी-सिन्नर मार्ग : दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

वाहतूक बंद; प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : देवळे येथील दारणा नदीवरील पुलाचा शनिवारी मलबा कोसळून भगदाड पडल्यानंतर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावांचाही घोटी शहराशी संपर्क तुटला आहे. केवळ पुलाच्या लगत असणाऱ्या देवळे गावातील नागरिकांना घोटीला येण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर अंतराचा वळसा मारून यावे लागते.
घोटीजवळील दारणा नदीवरील देवळे पुलाला भगदाड पडल्याने या पुलावरील सर्वच वाहतूक शनिवारपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले असून, घोटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावातील नागरिकांना याची झळ बसत आहे. या भागातील नागरिकांना येथील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून अक्षरश: जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सदर पुलावरील भगदाड दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, पुलाला बेरिंग टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.