रिक्षाचालकांकडूनच वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: March 16, 2016 23:08 IST2016-03-16T23:07:48+5:302016-03-16T23:08:20+5:30
रविवार कारंजा : वाहतूक शाखेचे दुर्लक्ष; दुहेरी वाहतूक सुरू

रिक्षाचालकांकडूनच वाहतुकीची कोंडी
पंचवटी : रविवार कारंजा ते महाबळ चौकापर्यंत रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम प्रशासनाने सुरू केल्याने काही दिवसांपासून अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे येणाऱ्या रस्त्यावरूनच दुहेरी वाहतूक सुरू आहे. एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असतानाही रविवार कारंजावर अनधिकृतपणे थांबा करून उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांकडून वाहतुकीची कोंडी केली जात असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू केल्याने शहर बस तसेच अन्य दुचाकी व चारचाकी वाहने रविवार कारंजाला वळसा घालून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या एकेरी रस्त्यानेच वाहने नेत आहेत; मात्र दुसरीकडे अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे येणाऱ्या वाहनधारकांना रविवार कारंजावरील वळणावर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला सामोरे जावे लागत आहे. काही रिक्षाचालक भररस्त्यातच रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याच्या कामात मग्न होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण करतात. या अनधिकृत रिक्षाथांब्यापासून काही फुटाच्या अंतरावर वाहतूक पोलीस उभे राहतात; मात्र त्यांचे या रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर अनेकदा रिक्षा उभ्या राहत असल्याने बसचालक व अन्य वाहनधारक यांच्यात कायम शाब्दिक वादंग निर्माण होत असतात. थांबा नसतांनाही अनधिकृतपणे रिक्षा रस्त्यात थांबवून त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असली तरी वाहतूक शाखा या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. (वार्र्ताहर)