सिन्नर येथे वाहतूक कोंडीने हाल
By Admin | Updated: November 14, 2015 21:54 IST2015-11-14T21:54:02+5:302015-11-14T21:54:46+5:30
दिवाळी सुटी : नाशिक-पुणे, सिन्नर-घोटी मार्गावर प्रवासी त्रस्त

सिन्नर येथे वाहतूक कोंडीने हाल
सिन्नर : दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक-पुणे व सिन्नर-घोटी-मुंबई महामार्गावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम येथील गावठा भागातील चौफुलीवर जाणवत असून, ‘ट्रॅफिक जाम’ होण्याच्या प्रकारामुळे वाहतूक अतिशय संथपणे सुरू आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सिन्नरकरांना प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
नाशिक - पुणे महामार्गावर शहरातील गावठा, बसस्थानक व आडवा फाटा भागात नित्याची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुभाजक टाकण्यात आले होते. त्यानंतर काही काळ वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र दिवाळीच्या सुट्ट्याच्या हंगामात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने व बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गावठा चौफुलीवर वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने नेल्याने या वाहतूक कोंडीत मोठी भर पडल्याचे चित्र होते.
दिवाळीच्या सुट्ट्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर उद्योगभवनपासून ते संगमनेर नाक्यापर्यंत गतिरोधक टाकण्यात आल्याने वाहतूक संथपणे पुढे सरकते. त्यामुळे त्याचाही परिणाम वाहतूक कोंडीवर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावठा भागातील गतिरोधक कमी करण्यात आले आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)