पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत विरांची मिरवणूक
By Admin | Updated: March 7, 2015 01:37 IST2015-03-07T01:35:02+5:302015-03-07T01:37:32+5:30
पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत विरांची मिरवणूक

पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत विरांची मिरवणूक
नाशिक : होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धूलिवंदननिमित्त प्रथेनुसार पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत विरांची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकातील होळी भोवती विविध देवदेवतांच्या तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत सजलेले वीर मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, सायंकाळी गंगाघाट परिसरात वीरांची मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज, खंडेराव, श्रीकृष्ण, भगवान शंकर, हनुमान आदि देवदेवतांच्या वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. वीरांना पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असते. याच दिवशी बाशिंगे आणि दाजिबा वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. दरम्यान, जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी चार वाजता मानाच्या वीर दाजिबा मिरवणुकीला प्रारंभ केला. वाघ्या- मुरळीच्या वाद्यवृंदात नाचत-गाजत वीरांच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. दरम्यान, परिसरातील युवकांनी नाचत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवसाला पावणारा म्हणून श्रद्धा असल्याने नागरिकांनी वीराला बाशिंगाचा जोड, हार, नारळ अर्पण केले. बुधवार पेठ, डिंगरअळी, संभाजी चौक, जुनी तांबट गल्ली, म्हसरूळ टेक, तिवंधा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा या मार्गे मध्यरात्रीच्या सुमारास ‘वीर’ मिरवणूक गोदाघाटावर पोहचली.
येथील होळीला वीरांकडून प्रदक्षिणा घालण्यात आली. खोबऱ्याच्या वाटीसह नवीन कापडात गुंडाळलेल्या देवतांचे टाक म्हणजेच प्रतिमांना गोदाजलाचा अभिषेक यावेळी घालण्यात आला.
लहान मुलांना खाद्यांवर घेऊन नागरिक वाद्याच्या चालीवर नाचत होते. दरम्यान, यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)