‘अशोका’ची राज्यातील पर्यटकांना भुरळ
By Admin | Updated: July 23, 2016 00:44 IST2016-07-23T00:37:26+5:302016-07-23T00:44:44+5:30
चित्रपट: चित्रीकरणानंतर नावारूपास आला धबधबा

‘अशोका’ची राज्यातील पर्यटकांना भुरळ
घोटी : नाशिक, ठाणे व पालघर जिल्ह्याच्या हद्दीवर व घाटनदेवीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विहीगाव येथील ‘अशोका’ धबधबा तिन्ही जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण राज्यातील पर्यटकांना भुरळ घालीत आहे. प्रत्येक वीकेण्डला या ठिकाणी राज्यभरातून हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असल्याने घाटनदेवी ते अशोका धबधबा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे.
मुंबई-आग्रा महामार्गापासून इगतपुरीजवळील विहीगाव या छोट्याशा खेड्याजवळ असलेला आंबेकडानामक धबधबा. हा धबधबा पूर्वीपासून असला तरी त्याकडे
फारसे लक्ष न गेल्याने फारसा नावारूपास नव्हता. मात्र सन २००१ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख खान आणि करिना कपूर यांच्या ‘अशोका’ चित्रपटाचे ‘सन सनांना’ या गीताचे चित्रीकरण या धबधब्यावर करण्यात आले आणि तेव्हापासून हा धबधबा ‘अशोका धबधबा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर अनेक प्रादेशिक व हिंदी चित्रपटांचे निर्माते चित्रीकरणासाठी या धबधब्याकडे वळू लागले. तेव्हापासून या धबधब्याकडे पर्यटकही आकर्षित झाले आहेत. (वार्ता०र)