काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

By अझहर शेख | Published: May 29, 2023 03:08 PM2023-05-29T15:08:27+5:302023-05-29T15:10:40+5:30

हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे. 

Tourists from Mumbai and Gujarat flock to Kalsubai Sanctuary to see the pattern of Kajavas | काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

नाशिक : रात्रीच्या किर्रर्र अंधारात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काही ठराविक वृक्षांवर काजव्यांची टिमटिम सुरू झाली  आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई शहरांसह गुजरात राज्यातूनही पर्यटकांची पावले आता मोठ्या संख्येने कळसुबाई अभयारण्याकडे वळू लागली आहेत. पहिल्या वीकेंडलाच अभयारण्य हाउसफुल्ल झालेले पहावयास मिळाले. सुमारे सहा ते सात हजार पर्यटकांनी भेट दिल्याचा अंदाज नाशिक वन्यजीव विभागाने वर्तविला आहे. हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे. 

निसर्गातील दुर्मिळ होत चाललेल्या काजवा कीटकाचे अप्रूप लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. काळानुरूप शहरी भागातून हा काजवा कधीच लुप्त झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात काजव्याची उत्पत्ती होण्यास अभयारण्यात सुरुवात होते. येथील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा या वृक्षांवर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. काजव्यांची संख्या हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप वळवाचा पाऊस या भागात झालेला नाही. काजव्यांची संख्या कमी असली तरी ती पर्यटकांची निराशा करणारी नसल्याचे येथील स्थानिक सांगतात. निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार बघण्यासाठी शनिवारी (दि. २८) तसेच रविवारीसुद्धा मोठी गर्दी उसळली होती.

हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही
नाशिक वन्यजीव विभागाने काजवा बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सालाबादप्रमाणे यंदाही नियमावलीची चौकट घालून दिली आहे. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील शेंडी व मुतखेल या दोन तपासणी नाक्यांवरून पर्यटकांना अभयारण्यक्षेत्रात निर्धारित वेळेत सोडले जात आहे. पर्यटकांनी वेळेचे बंधन ठेवून विनाकारण वादविवाद करणे टाळावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी केले आहे.

शाश्वत निसर्ग पर्यटनावर द्यावा भर
अभयारण्य क्षेत्रात रात्री काजवे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कुठल्याहीप्रकारे गोंगाट व गोंधळ करू नये. वन्यजीव विभागाने नेमणूक केलेल्या वाटाड्यांसह स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे, त्यांच्याशी अरेरावी करणे टाळावे. स्वयंशिस्तीने शाश्वत निसर्ग पर्यटन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे. वन्यजीव विभागाने घालून दिलेल्या १५ नियमांचे पालन अभयारण्य क्षेत्रात बंधनकारक आहे.

रात्री ९ वाजेनंतर ‘नो-एन्ट्री’
अभयारण्यात काजवे बघण्यासाठी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत यावे. रात्री ९ वाजेपासून पुढे कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही, असे नाशिक वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे. प्रति व्यक्ती, प्रति वाहन प्रवेश शुल्क वन्यजीव विभागाकडून आकारले जात आहे. तपासणी नाक्यांवर प्रवेश शुल्कावरून कोणीही वाद घालू नये, अन्यथा वन्यजीव विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी दिला आहे.

पार्किंगस्थळाचा वापर आवश्यक
मुतखेल, शेंडी या दोन्ही नाक्यांवरून आत प्रवेश केल्यानंतर स्थानिकांच्या घरांजवळील महसुली जागेत वन्यजीव विभागाने मोफत पार्किंगव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांनी या जागांवर वाहने उभी करून जवळच्या काजवा पॉइंटवर पायी चालत जावे. यावेळी मोबाइल टॉर्चचा केवळ रस्ता बघण्यासाठी वापर करण्यास मुभा राहील, असे वन विभागाने सांगितले आहे. अभयारण्यक्षेत्रात वाहनांचे दिवे मंद ठेवावे व अनावश्यकरित्या हॉर्न वाजवू नये, असे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Web Title: Tourists from Mumbai and Gujarat flock to Kalsubai Sanctuary to see the pattern of Kajavas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.