पर्यटनाला मिळतेय चालना

By Admin | Updated: September 27, 2014 00:16 IST2014-09-27T00:16:09+5:302014-09-27T00:16:35+5:30

पर्यटनस्थळांचा विकास : पर्यटकांच्या ‘मुक्काम’ वाढीसाठी प्रयत्न; लौकिकात भर

Tourism is getting promoted | पर्यटनाला मिळतेय चालना

पर्यटनाला मिळतेय चालना

नाशिक : ऐतिहासिक व धार्मिक-पौराणिक महत्त्व असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख असली, तरी अलीकडे वायनरी सिटी म्हणून शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे. त्याचप्रमाणे राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रयोग विशेषत: गंगापूर गावाच्या शिवारात केले जात आहे.
शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या गंगापूर धरण परिसरात सुसज्ज अद्ययावत आधुनिक पद्धतीचे बोटिंग क्लब विकसित केले जात आहे, जेणेकरून नाशिकला पर्यटकांचा मुक्काम वाढीसाठी मदत होणार आहे. शासनाकडून यासाठी जलसंपदा विभागाला पर्यटन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून जलसंपदा विभागामार्फत सध्या गंगापूर धरणालगत बोटिंग क्लब विकसित केला जात असून, बोटिंग क्लबचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून एकूण ३७ बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. यामध्ये साधारणत: वीस बोटी या इंजिनवर चालणाऱ्या, तर उर्वरित बोटी या नावाड्यांमार्फत चालविल्या जाणार आहेत. गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य परिसरात नौकाविहार करण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. येत्या काही महिन्यांत बोटिंग क्लबचे काम पूर्णत्वास येऊन जलसंपदा विभागाकडून राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित के ला जाणार आहे. त्याचप्रमाणे गंगापूर-गोवर्धन शिवारातच दिल्लीच्या हाट बाजारच्या धर्तीवर सुमारे चार हजार चौरस मीटर जागेवर ‘नाशिक कलाग्राम’ साकारला जात आहे. कलाग्रामचेदेखील बांधकाम वेगाने सुरू असून, अकरा महिन्यांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण के ला जाणार आहे.
पायाच्या वरपर्यंत बांधकाम आले असून, संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. या कलाग्राममध्ये एकूण शंभर दुकाने उपलब्ध क रण्यात येणार आहेत. याचबरोबरच स्थानिक कलावंतांच्या कलेलादेखील याठिकाणी व्यासपीठ मिळणार आहे. याचबरोबर कलाग्रामच्या आवारात प्रशासकीय इमारत, सभागृह, पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून ‘लोकनिवास’ची देखील सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढण्याबरोबरच त्यांचा शहरात मुक्काम करण्याचादेखील कल कसा
वाढेल यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या द्राक्षांची चव जगभर प्रसिद्ध असून, या द्राक्षांपासून निर्माण केली जाणारी वाईनदेखील जगभर पोहचली आहे.
दरवर्षी येथील प्रसिद्ध वाईनच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी शेकडो विदेशी पर्यटक हजेरी लावतात.
त्यामुळे या पर्यटकांचा नाशिकला मुक्काम वाढावा व त्या माध्यमातून शहराला उत्पन्न प्राप्त होऊन विकास साधला जावा यासाठी गंगापूर शिवारात कलाग्राम, बोटिंग क्लब यांसारखे पर्यटनपूरक प्रकल्प साकारले जात आहेत. पर्यटनाला चालना देणाऱ्या अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात नाशिकचे पर्यटन अधिक विकसित होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tourism is getting promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.