पालिका शाळांना अव्वल दर्जाचे वेध

By Admin | Updated: May 22, 2014 22:18 IST2014-05-22T22:18:45+5:302014-05-22T22:18:45+5:30

शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि अन्य प्रकल्पांच्या आधारे राबविण्यात येत असलेल्या माझी समृद्ध शाळा उपक्रमात ..

Top quality watch for municipal schools | पालिका शाळांना अव्वल दर्जाचे वेध

पालिका शाळांना अव्वल दर्जाचे वेध

नाशिक : शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि अन्य प्रकल्पांच्या आधारे राबविण्यात येत असलेल्या माझी समृद्ध शाळा उपक्रमात १२७ पैकी अव्वल (अ-१) दर्जाची एकही शाळा समाविष्ट नाही. अ-२ मध्ये मात्र १३ शाळा आहेत. त्यामुळे आता या शाळांना वरिष्ठ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण मंडळाने तयारी केली असून, सर्व केंद्रप्रमुखांकडून शाळांमधील भौतिक सुविधांच्या उणिवांविषयी अहवाल मागविण्यात आला आहे.
शाळांमध्ये सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शैक्षणिक सोयींवरच शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझी समृद्ध शाळा प्रकल्प राबविण्यात येतो. विविध निकषांच्या आधारे शाळांचे परीक्षण करून तीनशे गुणांपैकी व्यवस्था बघून गुणदान केले जाते आणि या गुणांच्या आधारे श्रेणी घोषित केली जाते. भौतिक आणि शैक्षणिक सुविधांमध्ये शाळा इमारत, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, फर्निचर, बाग, ग्रंथालय अशा एकूण २५ बाबींचा समावेश असून, त्यासाठी ८६ गुण आहेत. लोकसहभागाअंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघ आणि पोषण आहार समितीसह सहा मुद्दे आहेत. गुणवत्ता विकासाअंतर्गत शैक्षणिक संधी, मुलींचे शिक्षण, विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांचे प्रवेश असे एकूण सहा मुद्दे आणि ३३ गुण आहेत. अ-१ हा दर्जा मिळवण्यासाठी २७१ ते ३00 गुण (९१ ते १00 टक्के) मिळवण्याची गरज असते. परंतु महापालिकेच्या १२७ शाळांपैकी एकही शाळा इतके गुण मिळवू शकलेली नाही. अ-२ दर्जासाठी २४१ ते २७0 गुण (८१ ते ९0 टक्के) आवश्यक असतात. त्यात मनपाच्या १३ शाळा आहेत. ब-१ या दर्जासाठी २११ ते २४0 गुण (७१ ते ८0 टक्के) असणे आवश्यक आहे. त्यात पालिकेच्या ४३ शाळा आहेत. अशाच प्रकारे क-१ गटात सात, क-२ गटात चार शाळा आहेत. मात्र ड या दर्जात एकही शाळा समाविष्ट नाही.
या शाळांना वरिष्ठ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्र समन्वयक आणि मुख्याध्यापकांना कोणत्या शाळेत कोणत्या सुविधा नाहीत किंवा अन्य कोणत्या त्रुटी आहेत याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तो आल्यानंतर त्रुटींचा वारंवार आढावा घेऊन शाळा वरिष्ठ श्रेणीत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Top quality watch for municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.