मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत नाशिक जिल्हा विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:02+5:302021-07-24T04:11:02+5:30
संदीप भालेराव नाशिक : मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत मतदारांची छायाचित्रे मिळविण्याच्या कामात नाशिक जिल्हा निवडणूक शाखेने विभागात अव्वल क्रमांक ...

मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत नाशिक जिल्हा विभागात अव्वल
संदीप भालेराव
नाशिक : मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत मतदारांची छायाचित्रे मिळविण्याच्या कामात नाशिक जिल्हा निवडणूक शाखेने विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाच्या नावापुढे आता त्याचे छायाचित्र लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे सहा हजार मतदारांची छायाचित्रे त्यांच्या घरी जाऊन मिळविण्यात निवडणूक शाखेला यश आले आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदारयादी शुद्धीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. बीएलओच्या माध्यमातून तसेच विशेष मतदार नोंदणी अभियान राबवून जिल्ह्याची मतदारयादी अद्ययावत करण्यात आली आहे. यापूर्वीच यादीतील मयत आणि दुबार नावे वगळण्यात आली असल्याने प्रश्न केवळ छायाचित्रांचा होता. मतदार यादीतील जवळपास ६५०० मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र नसल्याने त्यांचे छायाचित्रे मिळविण्याचे आव्हान निवडणूक शाखेपुढे होते. यासाठी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार जास्तीत जास्त मतदारांची छायाचित्र मिळविण्यात आली होती.
१५ जुलैपर्यंत मतदारयादी अद्ययावत करण्याच्या सूचना आयोगाने दिल्यामुळे उर्वरित मतदारांची छायाचित्र मिळविण्याचेदेखील कामकाज सुरूच ठेवण्यात आले होते. यासाठी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदारसंघनिहाय कक्षात येऊन छायाचित्रे तपासण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्यांची छायाचित्रे नाहीत त्यांनी त्याबाबतचा अर्ज भरून लागलीच छायाचित्रे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याशिवाय बीएलओ ग्रामीण भागात संबंधितांच्या घरापर्यंत पोहचून छायाचित्र संकलित करीत असल्याने निर्धारित वेळेत नाशिकने संपूर्ण छायाचित्रे मिळविली.
जिल्ह्यातील मालेगाव मध्य, कळवण, नाशिक पश्चिम, इगतपुरी, चांदवड, सिन्नर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, येवला, निफाड, दिंडोरी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य तसेच देवळाली या मतदारसंघांतील मतदारांची सर्वच्या सर्व छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.