उद्या पाचवा अंतिम श्रावणी सोमवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:04+5:302021-09-05T04:19:04+5:30
त्र्यंबकेश्वर : या वर्षातील व्रत वैकल्याचा व धार्मिक पूजेची रेलचेल असणारा श्रावण महिना येत्या ६ सप्टेंबर रोजी सोमवती ...

उद्या पाचवा अंतिम श्रावणी सोमवार
त्र्यंबकेश्वर : या वर्षातील व्रत वैकल्याचा व धार्मिक पूजेची रेलचेल असणारा श्रावण महिना येत्या ६ सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र असा श्रावण मास संपणार आहे. सहसा असा योग कमी वेळा येतो. या वर्षी ६ तारखेला श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी पोळा सणही सुरू होतो.
तसे मागील अनुभव पाहता, शासनाच्या सर्वच यंत्रणांनी कोविडचा धसका घेतला आहे. अन्य राज्यांत मंदिरे, धार्मिक प्रार्थना स्थळे उघडली असताना, महाराष्ट्रात मात्र अजूनही कायम निर्बंध आहेत. गावात चर्चा होती की, निदान आषाढी एकादशीच्या दिवशी तरी मंदिर उघडेल, पण मंदिरे उघडली नाहीत. श्रावण मासात तरी मंदिरे उघडतील, पण तेही झाले नाही. त्यामुळे भाविकांचा उत्साह सळसळत्या तरुणाईचा परिक्रमेला जाण्याचा हा महिना कोविडच्या निर्बंधामुळे हिरमोड झाला, तरी मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडली नाहीत.
६ सप्टेंबरला श्रावण मासही संपणार आहे. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण मास सुरू झाला, तो दिवस पहिला श्रावणी सोमवार (दि.९) पासून व सोमवारीच संपणारही आहे. म्हणून या वर्षी पाच सोमवार भाविकांच्या वाट्याला आले. धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. या अमावस्येच्या दिवशी स्नान व दानाचे महत्त्व आहे. तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते. याबरोबरच गोदान अन्नदान दानधर्म भोजन आणि वस्त्रदान आदींचे दान करणे पुण्यकारक मानले आहे.
सोमवार हा भगवान शिवाचा वार आहे. त्यात शेवटचा श्रावण सोमवार सोमवती दर्श अमावस्या असा दुर्मीळ योग आहे. बळीराजाच्या बैलांचा सण पोळा असल्याने, या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणूनही संबोधले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. याशिवाय पितरांना तर्पणही याच दिवशी दिले जाते. मात्र, त्र्यंबकेश्वरला कोरोनाच्या निर्बंधामुळे संपूर्ण श्रावणमास भाविकांच्या दृष्टीने निराशाजनकच गेला.