टोमॅटोचे वाहन फसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:02+5:302021-09-13T04:14:02+5:30
टोमॅटोला भाव नाहीच पण दळणवळणाची सोय पण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध केला. पिंपळगाव ...

टोमॅटोचे वाहन फसले
टोमॅटोला भाव नाहीच पण दळणवळणाची सोय पण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध केला.
पिंपळगाव बसवंत शहरात उड्डाणपुलामुळे वाहनांची कोंडी थांबली. मात्र, सर्व्हिस रोडच्या दुर्लक्षित पणामुळे जीवितहानी वाढली. उंबरखेड चौफुली, चिंचखेड चौफुली आणि वणी चौफुली दरम्यान असलेल्या सर्व्हिस रोडची मोठी दयनीय अवस्था झाली असून परिणामी दररोज वाहनधारकांना छोट्या-मोठ्या अपघातांना बळी पडावे लागत आहे. जोपुळ रोडला बाजार समिती असल्याने सर्व्हिस रोडचा वापर शेतमाल करणारे वाहनच मोठ्या प्रमाणात करतात हे माहीत असतानादेखील संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना या खड्ड्यांतून वाट काढताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. शहरात असलेला दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाला कधी जाग येईल ते सांगता येत नाही. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना शेतकरी व वाहनधारक व्यक्त करीत आहेत.
कोट....
गेल्या कित्येक दिवसांपासून चिंचखेड चौफुलीजवळील सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झालेली आहे. वारंवार प्रशासनाला कळवून देखील प्रशासन कोणतीही भूमिका घेत नाही. त्यामुळे शेतकरी व पिंपळगावकरांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- हर्षल जाधव, अध्यक्ष
जगदंब प्रतिष्ठान पिंपळगाव बसवंत