भाव नसल्याने टमाटा शेतात
By Admin | Updated: January 31, 2017 01:30 IST2017-01-31T01:30:35+5:302017-01-31T01:30:56+5:30
शेतकरी हवालदिल: पुढील हंगामाच्या तयारीत

भाव नसल्याने टमाटा शेतात
ओझर : नाशिक जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत टमाट्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टमाटा खुडणी बंद करून टमाटा पीक तसेच सोडून दिले आहे. आज टमाट्याचा भाव पहिला तर झाड बांधणीच्या सुतळीचा खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत शेतात पिकलेला टमाटा शेतकरी सोडून देत पुढच्या हंगामाची तयारी करीत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना यंदा टमाटा या पिकाने जोरदार झटका दिला. टमाटा शेतातून बाजारात नेण्यासाठी लागणारी मजुरी तर सोडाच; तो बांधण्यासाठी सुतळीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नोटाबंदीचा परिणाम असल्याचे काही सांगतात तर काही पीक जास्त आले असे सांगतात. निर्यात बंद झाली अशीही चर्चा आहे. परंतु शेतकऱ्यांचे यात मरण झाले हे नक्की. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना बाजारातून पैसे मिळत नाहीत हेही तितकेच खरे. पुढील पिके लावण्यासाठी कुठून पैसे आणायचे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)