मागणी घटल्याने टमाटा स्वस्त
By Admin | Updated: August 10, 2014 02:17 IST2014-08-10T02:16:50+5:302014-08-10T02:17:05+5:30
मागणी घटल्याने टमाटा स्वस्त

मागणी घटल्याने टमाटा स्वस्त
पंचवटी : पंधरवड्यापूर्वी ७० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याची मागणी पावसामुळे घटल्याने बाजारभावात घसरण झाली. सोमवारी टमाट्याच्या वीस किलो जाळीला साडेआठशे रुपये असा भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी टमाट्याची आवक घटल्याने बाजारभाव चांगलेच तेजीत आले होते. मात्र, आज बाजार समितीत टमाटा ४५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाला असला तरी किरकोळ बाजारात ८० रुपये प्रतिकिलो दरानेच विक्री होत आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मुंबई, गुजरात राज्यांत टमाट्याची मागणी कमी झाल्याने आणि आवक वाढत चालल्याने बाजारभावात घसरण होत आहे. पावसामुळे परराज्यातील व्यापारी माल खरेदी करीत नाहीत, तसेच माल बाजार समितीत पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे नाशिक बाजार समितीतून परराज्यात, तसेच अन्य बाजार समित्यांत विक्रीसाठी जाणारा माल ५० टक्क्यापर्यंत कमी झाला आहे.
आगामी कालावधीत टमाटा मालाची आवक वाढल्यास बाजारभाव आणखी काही प्रमाणात घसरतील, असेही बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)