गटार योजनेबाबत टोलवाटोलवी

By Admin | Updated: September 4, 2014 00:51 IST2014-09-04T00:51:13+5:302014-09-04T00:51:47+5:30

गटार योजनेबाबत टोलवाटोलवी

Tollwatolvi about the drainage scheme | गटार योजनेबाबत टोलवाटोलवी

गटार योजनेबाबत टोलवाटोलवी



नाशिक : सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नेहरू अभियानांतर्गत योजना राबविण्यासाठी प्रकल्प अहवाल करण्याची तयारी दर्शविली; मात्र योजना राबविण्यासाठी तीस टक्के निधी खर्चासाठी औद्योगिक विकास महामंडळ आणि महापालिका तयार नसल्याने या विषयाची टोलवाटोलवी सुरू आहे. दरम्यान, पिंप्री चिंचवड येथे अशाच प्रकारे प्रकल्प राबविण्यात आला असून, त्याचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे बुधवारी पालिकेत आयोजित बैठकीत ठरविण्यात आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सुविधांबाबत जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महापालिकेशी संबंधित विषयांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक बुधवारी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या दालनात पार पडली. जिल्हाधिकारी विलास पाटील आणि पालिकेच्या आयुक्त सोनाली पोंक्षे वायंगणकर यांच्यासह पालिकेचे खाते प्रमुख आणि विविध शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत औद्योगिक विकास महामंडळ नियोजन आणि विकास प्राधीकरण आहे. त्यामुळे सांडपाण्याच्या निचरा आणि गटार योजना राबविण्याचा मुद्दा यापूर्वी चर्चिला गेला तेव्हा तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी महामंडळाने गटार योजनेबाबत केंद्र शासनाच्या नेहरू अभियानांतर्गत विस्तृत प्रकल्प अहवाल पाठविल्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून ७० टक्के निधी मिळू शकतो आणि ३० टक्के निधी महामंडळाला खर्च करावा लागेल, असे सुचविले होते. परंतु नंतर महामंडळाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यासंदर्भात बुधवारी बैठकीत चर्चा झाली तेव्हा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३० टक्के निधी खर्च करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर बरीच चर्चा झाली.
औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा केला जात असल्याने महामंडळानेच खर्च केला पाहिजे, असेही एक मत मांडण्यात आले. दरम्यान, शासनाच्या नगरविकास खात्याने आदेश दिल्यास महापालिका त्यानुसार कार्यवाही करेल काय? अशी विचारणा केली. त्यावर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तशी तयारी दर्शविली. पिंप्री चिंचवड येथे अशाच प्रकारे औद्योगिक वसाहतीत प्रकल्प राबविण्यात आला असून, त्यात महापालिकेनेच खर्च केल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार तेथील माहिती घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीतील चर्चेत निमाचे अध्यक्ष रवि वर्मा, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, मनिष कोठारी, व्हिनस वाणी, रमेश पवार, मंगेश पाटणकर, निखिल पांचाळ यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tollwatolvi about the drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.