स्वच्छ भारत अभियानांतर्गत सात हजार कुटुंबांना शौचालय
By Admin | Updated: October 5, 2015 23:50 IST2015-10-05T23:50:06+5:302015-10-05T23:50:42+5:30
पालिकेची कार्यवाही : आॅनलाइन अर्ज भरणार

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सात हजार कुटुंबांना शौचालय
नाशिक : भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७१७४ कुटुंबांना शौचालय बांधून दिले जाणार असून, त्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. सध्या आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर भारत सरकारकडून संबंधितांना शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता, ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले. ७१५४ कुटुंब मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले असून, त्यांना भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीकरिता अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदर कुटुंबांकडून प्राप्त झालेले अर्ज भारत सरकारकडे आॅनलाइनमार्फत जमा केले जाणार आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून त्यासंबंधीची कार्यवाही सुरू आहे. भारत सरकारमार्फतच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे.
भारत सरकारकडून शौचालय उभारणीसाठी प्रति १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)