वडझिरे येथे बांधले शौचालय

By Admin | Updated: December 6, 2015 22:58 IST2015-12-06T22:57:56+5:302015-12-06T22:58:30+5:30

सुविधा : ग्रामविकास समितीचा पुढाकार; लोकवर्गणीतून झाली निर्मिती

Toilets built at Wadzhira | वडझिरे येथे बांधले शौचालय

वडझिरे येथे बांधले शौचालय

नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील ग्रामविकास समितीने लोकवर्गणीतून दलितवस्तीमध्ये पाच शौचालयांच्या युनिटचे बांधकाम करून सेवा आणि बांधिलकीचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. लोकवर्गणीतून जमलेल्या सुमारे सव्वादोन लाख रुपयांच्या निधीतून ‘फक्त महिलांसाठी’ पाच सीटच्या शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘ग्रामविकास म्हणजे राष्ट्राचा विकास’ हे ब्रीद घेऊनच सामाजिक काम करणाऱ्या ग्रामविकास समितीने यापूर्वीही वडझिरे येथे अनेक स्वच्छताविषयक उपक्रम राबविले आहेत. गावात स्वच्छ भारत अभियान व हगणदारीमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दलितवस्तीसारख्या दुर्लक्षित भागात शौचालयांअभावी होणारी कुचंबणा टाळण्यासाठी लोकवर्गणीतून फक्त महिलांसाठी शौचालयांचे बांधकाम करण्याचा निर्णय ग्रामविकास समितीने
घेतला.
ग्रामविकास समितीचे सदस्य व मुंबईस्थित पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी परिसरातून सुमारे सव्वादोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. या रकमेतूनच येथील दलितवस्तीत पाच सीटच्या शौचालय युनिटचे बांधकाम पूर्ण करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर १२ डिसेंबर रोजी या शौचालयाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास समितीचे भास्कर ठोंबरे, अशोक नागरे, रंभा बोडके, जगन बोडके, अशोक बोडके, अंबादास सांगळे, नामदेव कापसे, संजू नागरे, भिकुलाल बोडके, रामचंद्र कापसे, भास्कर कापसे, देवराम ठोंबरे, भास्कर गिते यांनी दिली.
केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान, राज्य शासनाचे हगणदारीमुक्त गाव व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासनाने हाती घेतलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांना सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तथापि, वडझिरेसारख्या ग्रामीण भागातही स्वच्छतेला प्राधान्य देणारा ग्रामविकासचा हा उपक्रम स्वच्छ भारत अभियानासाठी खऱ्या अर्थाने बळ देणारा ठरणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Toilets built at Wadzhira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.