प्रसूतिगृहांची टोलवाटोलवी; प्रशासन करणार चौकशी
By Admin | Updated: April 30, 2016 00:02 IST2016-04-29T23:45:38+5:302016-04-30T00:02:54+5:30
प्रसूतिगृहांची टोलवाटोलवी; प्रशासन करणार चौकशी

प्रसूतिगृहांची टोलवाटोलवी; प्रशासन करणार चौकशी
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमधील प्रसूतिगृहांत येणाऱ्या महिलांना अन्य रुग्णालयांत पाठविण्यात येत असल्याबद्दल लोकनिर्णय सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनपा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली आहे.
महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड केली जात असल्याबद्दल लोकनिर्णय सामाजिक संस्थेने सर्वेक्षण करत तेथील कारभारावर प्रकाश टाकला होता. सदर सर्वेक्षणाचा अहवाल ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, सदर प्रकरणाची संपूर्णपणे तपासणी करून चौकशी करण्यात येईल. त्यात कोणी दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाईही करण्यात येईल. महापालिकेच्या रुग्णालयात असा प्रकार होत असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. लोकनिर्णय संस्थेने सदर सर्वेक्षणाचा अहवाल महापालिकेलाही दिला होता. त्यानुसार जनसुनवाई घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने ती पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.