महानगरपालिकेसाठी आज मतदान
By Admin | Updated: February 21, 2017 01:47 IST2017-02-21T01:47:10+5:302017-02-21T01:47:28+5:30
महानगरपालिकेसाठी आज मतदान

महानगरपालिकेसाठी आज मतदान
नाशिक : महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या १२२ जागांसाठी मैदानात उतरलेल्या ८२१, तर जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बंदिस्त होणार आहे. मतदानप्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना त्यांच्या नावासह मतदान केंद्रांची माहिती तत्काळ मिळावी, याकरिता निवडणूक आयोगासह प्रशासनाने संकेतस्थळासह मोबाइल अॅप्लिकेशन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेसाठी यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्यात येत आहे. द्वारका-भाभानगर भागातील प्रभाग क्रमांक १६ आणि नाशिकरोड गोरेवाडी भागातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये प्रत्येकी तीन, तर अन्य सर्व २९ प्रभागांमध्ये एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार आहे. मतदाराला कुणालाही मत द्यायचे नसल्यास त्यासाठी ‘नोटा’ हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. मतदानासाठी शहरात ६३९ इमारतींमध्ये १४०७ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. दोन आठवड्यांपासून शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी उडाली होती. प्रामुख्याने, उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांसह मतदारांच्या भेटी-गाठींवर भर दिला होता. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभांनीही निवडणुकीच्या वातावरण निर्मितीत भर घातली. रविवारी (दि.१९) जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर सोमवारी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या वाटप करण्याची धावपळ सुरू होती, तर मतदान केंद्रांवर प्रतिनिधी नेमण्यापासून ते केंद्राबाहेर बूथ लावण्यापर्यंतचे नियोजन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जिल्ह्यातील १४६ पंचायत समिती गणांसाठी ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी भाजपाचे ६८, शिवसेनेचे ६५, राष्ट्रवादीचे ५८, कॉँग्रेसचे ४४, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १२ यांच्यासह अपक्ष मिळून ३३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्'ात २६४६ मतदान केंद्रे असून, त्यासाठी पाच हजार ९२ मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोच करण्यात आली आहेत. ११०० मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर १७ हजार ३४० मतदान कर्मचारी तैनात करण्यात आली आहेत. येत्या २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होेऊन दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२८७ क्षेत्रीय अधिकारी
निवडणुकीसाठी संपूर्ण ७३ जिल्हा परिषद गट व १४६ पंचायत समिती गणांसाठी २८७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे क्षेत्रीय अधिकारी त्या त्या मतदान केंद्रांवरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम पाहतील. जिल्'ासाठी एकूण १७ हजार ३४० अधिकारी व कर्मचारी १० टक्के राखीव स्टाफसह नियुक्त करण्यात आले आहेत.