फेर निवडणुकीसाठी आज पराभूतांची बैठक
By Admin | Updated: February 26, 2017 00:25 IST2017-02-26T00:25:01+5:302017-02-26T00:25:11+5:30
पुन्हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची मागणी

फेर निवडणुकीसाठी आज पराभूतांची बैठक
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीतील सर्व पक्षांमधील पराभूत उमेदवारांची बैठक रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मारक येथे बोलविण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी करण्यासाठी बैठकीत चर्चा केली जाणार आहे. इव्हीएम मशीनबद्दल फार मोठ्या प्रमाणात तक्रारी व शंका घेतल्या जात आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतून गहाळ झालेली मतदारांची नावे याबाबतही घोटाळा झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आलेली आहे. एकाच पक्षाकडून प्रसारमाध्यमांचा वारेमाप गैरवापर होत आहे आणि निवडणूक आयोग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही बाब लोकशाहीला धोकादायक असून, एकंदरीत निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित होत असल्याने सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून फेरमतदान घेण्याकरिता या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे पुरोगामी लोकशाही आघाडीचे समन्वयक डॉ. संजय अपरांती यांनी सांगितले. नव्याने निवडणूक इव्हीएम वोटिंग मशीनऐवजी बॅलेटवर घेण्याची मागणी केली जाणार असून, त्यासाठी पराभूत उमेदवारांची पहिली बैठक रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता बोलविण्यात आली आहे. यावेळी डॉ. डी. एल. कराड, विलास देसले, श्रीधर देशपांडे, आनंद ढोली आदि यावेळी मार्गदर्शन करणार आहे. पराभूत उमेदवारांनी पक्षभेद बाजूला ठेवून या जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अपरांती यांनी केले आहे. (प्रतिनिधी)