दृष्टिहीन संघाची आज निवडणूक
By Admin | Updated: January 9, 2016 22:31 IST2016-01-09T22:28:08+5:302016-01-09T22:31:44+5:30
मनमाड : ब्रेल लिपीतील मतपत्रिकेद्वारे होणार मतदान

दृष्टिहीन संघाची आज निवडणूक
मनमाड: राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नाशिक विभागाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १०) मनमाड येथे मतदान होत असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. वीस जागांसाठी ४७ उमेदवार या निवडणूक रिंगणात असून
ब्रेल लिपीतील मतपत्रिकेद्वारे
मतदान घेण्यात येणार असल्याने पूर्णपणे गुप्त मतदान केल्याचा प्रत्यय अंध मतदारांना येणार आहे.
संधी, समानता व सुरक्षितता या तत्त्वावर १९७० साली भारतात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कामकाज १९७४ साली महाराष्ट्रात सुरू झाले. राज्यातील सात विभागात या संघाची व्याप्ती आहे. दर चार वर्षांनी या संघाची कार्यकारिणीसाठी निवडणूक होत असते. नाशिक विभागामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, नगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून ४७२ सदस्य संख्या आहे.
या निवडणुकीसाठी मनमाड येथील हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ ते साडेबारा या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी नितीन पांडे, निवडणूक अधिकारी कल्पेश बेदमुथा, सहायक निवडणूक अधिकारी अंकुश जोशी हे काम पहात असून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रघुनाथ बारड (जालना), प्रवीण पाटकर (नाशिक) हे प्रयत्नशील आहे.
(वार्ताहर)