नाशिक जिल्ह्यासाठी तूरडाळीचा आज फैसला
By Admin | Updated: July 30, 2016 00:51 IST2016-07-30T00:45:52+5:302016-07-30T00:51:29+5:30
नाशिक जिल्ह्यासाठी तूरडाळीचा आज फैसला

नाशिक जिल्ह्यासाठी तूरडाळीचा आज फैसला
नाशिक : रेशन दुकानावर स्वस्त दरात गोरगरिबांना तूरडाळ उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्याला लागणाऱ्या सुमारे पावणेपाच हजार क्ंिवटल तूरडाळ पुरविणारा ठेकेदार शनिवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत ठरणार असून, परवडणारा दर व वाहतूक खर्चाचा विचार करता, ठेकेदाराला १२० रुपये दराने डाळ देणे शक्य झाल्यास आॅगस्ट महिन्यात सणासुदीला गोरगरिबांना वरण-भाताचा बेत करणे शक्य होणार आहे.
तूरडाळीचे खुल्या बाजारात १८० ते २०० रुपये दर झाल्यामुळे वरणाचा बेत सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला असून, गोरगरिबांनी तर तूरडाळीकडे कधीच पाठ फिरविल्यामुळे राज्य सरकारवर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना रेशनवर स्वस्त दरात तूरडाळ देण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी व दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिकाप्राप्त लाभेच्छुकांची माहिती गोळा करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात चार लाख ८७ हजार ९४७ इतके लाभेच्छुक असल्याची माहिती यापूर्वीच पुरवठा विभागाने शासनाला कळविली असून, रेशनवर तूरडाळ पुरवठा खात्याने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या ठेकेदारांकरवी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी मुंबईत नाशिक जिल्ह्यासाठी ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तूरडाळ थेट जिल्ह्यातील १७ गुदामांपर्यंत पोहोचविण्यासाठी येणारा खर्च धरून १२० रुपये दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहतूक ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी चार हजार आठशे क्ंिवटल इतकी तूरडाळ लागणार असून, प्रति कार्डधारकास महिन्याकाठी एक किलो इतकीच डाळ देण्यात येणार आहे.
शनिवारी होणाऱ्या लिलाव पद्धतीत ठेकेदार निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशन दुकानापर्यंत तूरडाळ पोहोचण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातील सणासुदीच्या दिवसात गोरगरिबांना तूरडाळीच्या वरणाचा बेत आखणे शक्य आहे. (प्रतिनिधी)