नगराध्यक्षपदाचा आज फैसला
By Admin | Updated: November 29, 2015 22:58 IST2015-11-29T22:58:14+5:302015-11-29T22:58:59+5:30
चांदवड : भाजपाचा नगराध्यक्ष, तर शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता

नगराध्यक्षपदाचा आज फैसला
चांदवड : नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. सोमवारी (दि. ३०) सकाळी ११ ते २ या वेळेत नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, लगेचच उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होईल. यासाठी भाजपा- सेनेच्या वतीने चांदवड तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने अपक्ष उमेदवार देवीदास ऊर्फ राजेंद्र शेलार यांनी अर्ज दाखल केला आहे.
गावात नवनवीन अफवांचे पेव फुटले असले, तरी भाजपाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यात एक अपक्ष उमेदवाराने भाजपाला पाठिंबा दिल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. असे असले तरी ऐनवेळी काही चमत्कार होतो की काय, असेही बोलले जात आहे. भाजपा-सेनेचे मिळून आठ व एक अपक्ष उमेदवार गेल्या दहा दिवसांपासून सहलीला गेल्याची चर्चा आहे.
निवडणुकीसाठी चांदवड नगरपरिषदेच्या पहिल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाला ५, शिवसेना ३, कॉँग्रेस ४, राष्ट्रवादी कॉँग्रेस २ व अपक्ष ३ असे १७ उमेदवार निवडून आल्याने स्पष्ट बहुमत असे झाले नाही. मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने आता चांदवडचे नगराध्यक्षाचे भवितव्य अपक्षांच्या हाती होते. भाजपा-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होईल असा दावा केला होता.
दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला एकत्र घेत मोट बांधली खरी त्यात जे तीन अपक्ष निवडून आले तेही कोतवाल गटाचेच होते. त्यामुळे बिनधास्त राहिलेले कोतवाल यांना एक अपक्ष उमेदवार त्यांच्याकडे शब्द देऊनही बाजूला गेल्याची चर्चा चांदवड शहरात होत आहे.
या घटनेने मात्र कोतवाल गटाला धक्का बसला असला तरी ऐनवेळी काहीही घडू शकते व चमत्कार होऊ शकतो. (वार्ताहर)